पावसामुळे कधी एकदा सुट्टी मिळतेयं या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईकराचे हे स्वप्न शुक्रवारी पूर्ण झाले. गुरुवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे शुक्रवारी सकाळपर्यंत रेल्वे वाहतूक पूर्णत: कोलमडून गेली. यातच रस्त्यांवरही गाडय़ांच्या लांबच लांब रांगा दिसू लागल्या. परिणामी, मुंबईकरांनी शुक्रवारी दांडी मारणे पसंत केले. तर काही कार्यालयांनी सुट्टीच जाहीर करून टाकली. यामुळे मुंबईकरांना आयता लाँग वीकेंड मिळाला. या वीकेंडला घरात बसणे अनेकांनी पसंत केल्यामुळे समाजमाध्यमांवर संदेश आणि विनोदांचा पाऊस पडू लागला.
‘काय करू गं, तुमच्याकडे कारण आहे ट्रेन बंद असल्याचं. पण माझं घर ऑफिसपासून १५ मिनिटांच्या अंतरावर आहे. मला जावंच लागेल,’ सकाळपासून बाहेर कोसळणाऱ्या पावसाचा अंदाज घेऊन महाविद्यालय आणि कार्यालयामध्ये जायचं की नाही याची चलबिचल प्रत्येकाच्या मनात होती. घर कार्यालयापासून लांब आहे, त्यांना ट्रेन बंद असल्याचे कारण होते. पण कार्यालयाच्या जवळ राहणाऱ्यांची मात्र पंचाईत उडाली. कार्यालयाला जाणे पसंत केलेल्यांना एकटेच बसण्याची पाळी आली. महाविद्यालयाच्या सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये जातीने हजर राहणारी मंडळीसुद्धा अशा पावसाची तमा न बाळगता महाविद्यालयात हजर राहिले आणि तिथे अडकले. पण आज आपल्यावर लक्ष ठेवायला कोणी नाही, हे लक्षात आल्यावर मात्र तेथेही पार्टीचे वातावरण रंगू लागले. महाविद्यालये, कार्यालयांमध्ये कामाऐवजी गरम चहा, कांदा भजी, वडापावची पाकिटं फिरू लागली. कित्येकांनी मनसोक्त भिजून घ्यायलाही सुरुवात केली होती. घरात थांबलेल्यांना शुक्रवार म्हणजे बोनसच होता. दुपारच्या जेवणासाठी चमचमीत मेनूची आखणी होऊ लागली. त्यामुळे सकाळपासूनच चिकन, मटणच्या दुकानांबाहेर रांगा लागू लागल्या होत्या. दुपारी चमचमीत जेवून तृप्त झाल्यानंतर घरीच चांगला सिनेमा पाहायचे किंवा मित्रांना बोलवून मैफील रंगवायचे बेतही आखले गेले.