पाणी न सोडण्याच्या प्रश्नाचे राजकारण होऊन त्यातून झालेल्या मारहाणीत एक युवक ठार झाला. हा प्रकार शेळोली (ता. भुदरगड) येथे मंगळवारी रात्री घडला. सत्तारूढ राष्ट्रवादी व विरोधी काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांत जोरदार हाणामारी होऊन त्यामध्ये अश्विन आनंदराव देसाई (वय ३०) हा ठार झाला. त्याचा मागील वर्षीच विवाह पार पडला होता. तर अन्य चौदा जण जखमी झाले. याबाबत गारगोटी पोलीस ठाण्यामध्ये नोंद झाली आहे. दरम्यान, गावात शुकशुकाट होता व तेथील भागास पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.    
शेळोली या गावामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन गटांत मोठा राजकीय वाद आहे. गेले चार दिवस या गावाला पाणीपुरवठा होऊ शकला नाही. याचा जाब विचारण्यासाठी विरोधी काँग्रेस पक्षातील काही लोक ग्रामपंचायतीकडे आले होते. त्यातून या वादाला राजकीय वळण मिळाले. प्रकरण मुद्यावरून गुद्यावर पोहोचले. काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या कार्यकर्त्यांत हाणामारीला सुरुवात झाली. उभय गटाकडील प्रत्येकी २० ते २५ कार्यकर्ते हाणामारीत सहभागी झाले होते. बेदम मारहाणीमध्ये आठ जण जखमी झाले. त्यातील अश्विन देसाई या युवकावर उपचार सुरू होते. गुरुवारी सकाळी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.