सुसंस्कृत आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वे घडविण्याच्या हेतूने विविध क्षेत्रातील दिग्गजांचा थेट संवाद करण्याची संधी उपलब्ध करून देणारी ठाण्यातील वेध व्यवसाय परिषद यंदा १४ ते १६ डिसेंबरदरम्यान गडकरी रंगायतनसमोरील समर्थ सेवक मंडळाच्या पटांगणावर भरविण्यात येणार आहे. गेली दोन दशके सातत्याने देशभरातील सृजनांची भेट घडवून आणणाऱ्या यंदाच्या २१व्या ‘वेध’चे विषयसूत्र ‘घागर ते सागर’ (फ्रॉम ड्रीम टु टीम) असे आहे. शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजता सुप्रसिद्ध लेखक आणि तत्त्वचिंतक प्रा. यशवंत पाठक परिषदेचा बीजसंवाद सादर करणार आहेत. त्यानंतरच्या सत्रात त्रिवेंद्रम येथील जर्मन युवती सॅब्रिए टेनबर्केन या युवतीची प्रकट मुलाखत घेतली जाणार आहे. संपूर्णपणे दृष्टिहीन असलेली सॅब्रिए भारतात केरळमध्ये अंध उद्योजकांचे प्रशिक्षण शिबीर चालविते.
जगभरातील अंध व्यक्तींच्या हक्कांसाठी लढणारी आणि अनेक आंतरराष्ट्रीय मानसन्मान मिळविणारी ही कार्यकर्ती वेध परिषदेच्या निमित्ताने प्रथमच भारतात येत आहे.‘वेध’ परिषदेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी शनिवार-रविवारी दुपारी तीन ते रात्री साडेनऊ या वेळेत विविध व्यक्तिमत्त्वांची ओळख विद्यार्थी-पालकांना होणार आहे. ‘टेस्ट ऑफ इंडिया’ असा लौकिक मिळविणाऱ्या अमूल उद्योग समूहाचा प्रवास दृकश्राव्य माध्यमाद्वारे उलगडला जाणार आहे.
जगातील विजेशिवाय चालणारा रेफ्रिजरेटर बनविणारे राजकोट येथील कुंभार मनसुख प्रजापती, काश्मीरच्या खोऱ्यामधील दहशतवादी वातावरणामध्ये मानवतावादी कार्य करणारा तरुण अधिक कदम, सातारा जिल्ह्य़ातील ‘आडवी बाटली’ या अभिनव व्यसनमुक्ती चळवळीचे आघाडीचे कार्यकर्ते विलास जवळ, कल्पक डिझायनर अभिजीत बनसोड, गोबीचे वाळवंट चालत पार करणारी पहिली भारतीय सुचेता कडेठाणकर, सुप्रसिद्ध गायिका अश्विनी भिडे, अभिनेता स्वप्निल जोशी, संगीतकार कौशल इनामदार, पोलीस अधिकारी रश्मी करंदीकर आणि नृत्य क्षेत्रातील गुरू डॉ. संध्या पुरेचा हे यंदाच्या ‘वेध’मध्ये सहभागी होणार आहेत. मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी, डॉ. दीपिका दाबके आणि पत्रकार रवींद्र मांजरेकर या व्यक्तिमत्त्वांशी संवाद साधणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 14 peoples stories in 21th vedh
First published on: 08-12-2012 at 01:39 IST