महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी गजानन खंडू तिवडे (रा.शहापूर, इचलकरंजी) व उत्तम राजाराम कागले (रा.यळगुड, ता.हातकणंगले) या दोघा आरोपींना सोमवारी दहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनाविण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.व्ही.पळसुले यांनी ही शिक्षा जाहीर केली.    
पीडित महिला ही पेठवडगाव (ता.हातकणंगले) येथे राहत होती. कामाच्या शोधात असणारी ही गरीब महिला जानेवारी २०१२ मध्ये तिवडे व कागले यांच्याकडे गेली होती. त्यांनी तिची ओळख करून घेतली. पीडित महिला विधवा व असाहाय्य असल्याचा गैरफायदा घेऊन या दोघांनी तिला सासऱ्याच्या ताब्यात असलेली मुले काढून देण्याचे आमिष दाखविले. तिला पेठवडगाव येथील एका लॉजवर नेऊन अत्याचार केला. तिला ठार मारण्याची धमकी दिली.
 याबाबत पेठवडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. सहायक पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड.संजय कुलकर्णी यांनी चार साक्षीदार तपासले. पीडित महिलेची साक्ष व सहायक सरकारी वकील कुलकर्णी यांचा युक्तिवाद ग्राह्य़ मानून न्यायालयाने दोघा आरोपींना विधवा महिलेचा गैरफायदा घेऊन विनयभंग केल्याप्रकरणी दहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनाविली. या दोघांना प्रत्येकी ५ हजार रुपये दंड करण्यात आला असून त्यातील निम्मी रक्कम पीडित महिलेला देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.