उत्तराखंडामध्ये गेल्या वर्षी झालेल्या जलप्रलयात नागपूरच्या ३७ यात्रेकरूंच्या नातेवाईकांना केंद्र व राज्य शासनाकडून ५.५० लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. राज्यात जलद गतीने मदतीचे वाटप करणाऱ्या जिल्ह्य़ांपैकी नागपूर हा एकमेव असा जिल्हा आहे.
ही मदत प्राप्त करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला मोठी कसरत करावी लागते. यात्रकरूंची नावे, पत्ते त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधणे आणि मदतीसाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता क रण्यापर्यंत यंत्रणेने बरीच मेहनत घेतली. बेपत्ता झालेल्या आणि नंतर मृत म्हणून घोषित करण्यात आलेल्या
३७ यात्रेकरूंच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून २ लाख तर
केंद्र शासनाकडून ३.५० लाख
असे प्रत्येकी ५.५० लाख रुपये
वाटप करण्यात प्रशासनाला यश आले.
उत्तराखंडामध्ये नागपूरहून ११८ यात्रेकरू गेले होते. या यात्रेकरूंची माहिती प्रशासनाकडे नव्हती. तेथे जेव्हा जलप्रलय झाला त्यावेळी ही माहिती गोळा करण्यात आली. सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ वाट बघितल्यावर त्या यात्रेकरूंना मृत घोषित करण्यात आले व मदत वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. राज्य शासनाकडून सर्वप्रथम मदत देण्यात आली. नंतर केंद्राच्या मदतीचे वाटप करण्यात आले. बेपत्ता असलेल्या यात्रेकरूंच्या शोधासाठी एक विशेष पथक रवाना करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय व विभागीय आयुक्त कार्यालय व विभागीय आयुक्त नियंत्रण कक्षही सुरू करण्यात आले होते. उत्तराखंडमध्ये गेलेल्या यात्रेकरूंच्या अनेक नातेवाईकांनी स्वत: या कक्षात येऊन माहिती दिली. या माहितीच्या आधारे उत्तराखंड सरकारसोबत संपर्क साधण्यात येत होता. विभागीय आणि जिल्हा पातळीवर रोज आढावा बैठकी घेऊन बेपत्ता यात्रेकरूविषयी माहिती मंत्रालयाला तसेच दिल्लीलाही कळविण्यात येत होती.