सांगोल्याजवळ सोलापूर ग्रामीण पोलिसांनी सापळा लावून स्कॉर्पिओ गाडीतून सुमारे ९० लाख रुपये किमतीचे दीड किलो सोने व ८३ किलो चांदीचे दागिने हस्तगत केले. गाडीतील तिघाजणांना रिव्हॉल्व्हरसह ताब्यात घेण्यात आले. हे तिघेही हुपरी (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील राहणारे आहेत.
एमएच ५० ए ५२०० या क्रमांकाच्या स्कॉर्पिओ गाडीसंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार सांगोला येथे पोलिसांनी सापळा लावला. गाडी टप्प्यात येताच पोलिसांनी गाडी थांबवून झडती घेतली असता, त्यात गाडीच्या पाठीमागच्या आसनाखाली दडवून ठेवलेले दीड किलो सोन्याचे दागिने व ८३ किलो चांदीचे दागिने सापडले. संशय बळावल्याने गाडीतील व्यक्तींची झडती घेतली असता, त्यापैकी एकाकडे पाच जिवंत काडतुसासह रिव्हॉल्व्हर आढळून आले. मोहन श्यामराव वाईंगडे (वय ५१), अभिजित कुंडले (वय २३) व चालक समीर सज्जन शिकलगार (वय ३२) यांना ताब्यात घेण्यात आले.
हे दागिने नांदेड येथे पोहोचवण्यासाठी हुपरी येथून निघालो होतो, अशी माहिती अटक झालेल्या तिघांकडून मिळाली. उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भोई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश सातपुते हे पुढील तपास करीत आहेत.