देशातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलीस दलास सध्या एकाच वेळी अनेक आघाडय़ांवर लढाई करावी लागत आहे. दहशतवादी, नक्षलवादी आदी घटकांचा सामना करताना अर्थात कर्तव्य बजावताना वर्षभरात देशातील ६६५ पोलीस अधिकारी आणि जवानांना वीरगती प्राप्त झाली. या शहीदवीरांना मंगळवारी येथे आयोजित पोलीस स्मृती दिन संचलन कार्यक्रमात भावपूर्ण वातावरणात मानवंदना देण्यात आली.
पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. या प्रसंगी नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक प्रवीण साळुंखे, महाराष्ट्र पोलीस अकादमीचे संचालक नवल बजाज, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते आणि पोलीस उपायुक्त निसार तांबोळी हे उपस्थित होते. पोलीस कवायत मैदानावर सकाळी आठ वाजता झालेल्या संचलन कार्यक्रमात सशस्त्र पुरुष पोलीस पथक, सशस्त्र महिला पोलीस पथक, पोलीस बॅण्डपथक यांनी मानवंदना दिली. या वेळी देशभरातील ६६५ वीरगती प्राप्त पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नावांचे वाचन करण्यात
आले.
सर्व प्रमुख उपस्थित अधिकाऱ्यांनी स्मृतिस्तंभास पुष्पगुच्छ अर्पण केले. त्यानंतर तीन वेळा बंदुकीच्या फैरी झाडून आणि ‘लास्ट पोस्ट’ची सलामी देण्यात आली.
मागील वर्षभरात वीरगती प्राप्त झालेल्या शहिदांमध्ये महाराष्ट्रातील १९ जणांचा समावेश आहे. त्यात साहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन पवार, हेड कॉन्स्टेबल आनंदा पल्लवे, सत्यवान कसनवार, इशांत भुरे, रविकुमार सुरवर, लालसु पुनगती, रोशन डांबरे, सुभाष कुर्मे, दुर्योधन नाकतोडे, तिरुपती आलम, लक्ष्मण मुंढे, उमेश जावळे, डब्लू रॉकी मिटी, राजन सिंग, गणपत मांडवी, गिरिधर आत्माराम, दीपक विधवे, सुनील मांडवी, ए. एस. परोन यांचा समावेश आहे