नागपुरात शाळकऱ्यांच ऑटोरिक्षाला ट्रकची धडक
विद्यार्थ्यांना शाळेत नेणाऱ्या ऑटोरिक्षाला भरधाव ट्रकने धडक दिल्याने रियांश जैन हा विद्यार्थी त्याच्या चिमुकल्या बहिणीदेखतच ठार झाला, तर ऑटोरिक्षाचालक व रियांशच्या बहिणीसह चार विद्यार्थी, असे पाचजण जखमी झाले असून त्यांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वर्धमाननगरातील महावीर चौकात बुधवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास हा अपघात घडल्यानंतर तेथे प्रचंड तणाव निर्माण झाल्याने मोठा पोलीस ताफा तैनात करावा लागला.
हे सर्व विद्यार्थी स्वामीनारायण स्कुलमध्ये शिकतात. सकाळी नेहमीप्रमाणे ऑटोरिक्षातून (एमएच/३१/एपी/५६४८) ते शाळेत निघाले. ऑटोरिक्षात पाच विद्यार्थी होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ऑटोरिक्षा महावीर चौकातून जात असताना समोरून आलेल्या ट्रकने (केएल/३५/ए/१६४९) ऑटोरिक्षाला धडक दिल्याने रियांश प्रवीण जैन उजव्या बाजूने खाली पडला आणि ट्रकखाली चिरडला गेला. यानंतर ऑटो डाव्या बाजूला कलंडला. रिक्षातील इतर विद्यार्थी घाबरले. त्यांच्या ओरडण्याने रस्त्यावरील नागरिकांसह या परिसरात नागरिकही धावले. ऑटोरिक्षाचालक व जखमी विद्यार्थ्यांना लोकांनी धीर दिला. तोपर्यंत तेथे प्रचंड जमाव जमला. रियांशचा मृतदेह बघून इतर विद्यार्थी घाबरले होते. त्यात रियांशची बहीणही होती. जखमी विद्यार्थ्यांचे विव्हळणे अंगावर काटे आणत होते.
काही वेळातच तेथे प्रचंड जमाव जमला. कुणीतरी पोलिसांना कळविले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र उनवणे यांच्यासह लकडगंज पोलीस तेथे पोहोचताच जमावाने त्यांना गराडा घातला. सर्वाचा राग पोलिसांवर होता. पोलिसांनी तातडीने खुशी, केतकी, जयंती, अक्षय व ऑटोरिक्षाचालक या जखमींना मेयो रुग्णालयात दाखल केले. रियांशचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात पाठवला. जमावाने पोलिसांना घेरले. जमावाचा रोख पाहून नियंत्रण कक्षाला सूचना देण्यात आली. तहसील, कळमना, नंदनवन, कोतवाली, सक्करदरा पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे, उपायुक्त जीवराज दाभाडे, सहायक पोलीस आयुक्त एन. झेड कुमरे घटनास्थळी आले, मात्र पोलीस आयुक्तांनी घटनास्थळी यावे, असा नागरिकांचा आग्रह होता. आमदार कृष्णा खोपडे, नगरसेवक बाल्या बोरकर, चेतना टांकही तेथे आले. संतप्त नागरिक ओरडतच होते. या परिसरात ट्रक व इतर जड वाहनांची वाहतूक मोठय़ा प्रमाणात होते. सकाळी सहा वाजेनंतर ट्रक शहरात आलेच कसे, असा नागरिकांचा सवाल होता. अपघात घडला तेव्हा या परिसरात कुठल्याच चौकात पोलीस नव्हते, असेही नागरिक ओरडून सांगत होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी रस्त्यावर ठाण मांडले. ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. काही वेळानंतर पोलीस आयुक्त कौशल पाठक तेथे पोहोचताच नागरिकांनी त्यांनाही गराडा घातला. सर्वांनीच बोलण्याचा प्रयत्न केल्याने तेथे गोंधळाचे वातावरण होते.
पोलीस आयुक्तांनी शांत राहण्याचे आवाहन करीत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. संतप्त जमावाने पुन्हा त्याच तक्रारी केल्या. सर्वाचे म्हणणे ऐकून घेतल्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन देऊन नागरिकांना शांतता पाळण्याचे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले. पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्यानंतर ते  निघून गेले. त्यानंतर जमाव तेथून हटला. अपघातानंतर ट्रकचालक ट्रकसह तेथून पळून गेला. एका दुचाकी चालकाने त्याचा पाठलाग केला. डिप्टी सिग्नलमधील रेल्वे फाटकाजवळ ट्रकला थांबवण्यास भाग पाडले. नागरिकांनी ट्रकचालकाला कळमना पोलिसांच्या हवाली
केले.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही वेळाने रियांशला अपघात झाल्याचे समजताच जैन कुटुंब हादरले. रियांश स्वामीनारायण विद्यालयात दुसरीत, तर त्याची बहीण खुशी पाचवीत शिकते. आज सकाळी नेहमीप्रमाणे हे दोघेही आईला आनंदाने टाटा करून ऑटोरिक्षात बसले. ऑटोरिक्षाचालक आणखी दोन-तीन विद्यार्थ्यांना घेऊन ते शाळेत जाणार होते, मात्र नियतीने घाला घातला. रियांशचे वडील व्यापारी आहेत. इतवारीत राहणारे प्रवीण जैन कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले. एकीकडे रियांशच्या मृत्यूची बातमी, तर दुसरीकडे घाबरलेल्या खुशीला धीर देण्याची वेळ जैन दांपत्यावर आली. खुशीला धीर देतानाच रियांशच्या आठवणीने त्यांना हुंदके अनावर झालेले होते. इतर लोक व त्यांचे नातेवाईक त्यांना धीर देत होते. हे दृश्य पाहून उपस्थितांनाही अश्रू आवरेनासे झाले.

मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accident in front of sister brother struct in accident
First published on: 27-12-2012 at 01:55 IST