राज्यातील बहुतांश शेती कोरडवाहू आहे. या शेतीत उत्पन्न व उत्पादकता वाढवून शेतीचा शाश्वत विकास आणि शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याभर भर दिला जात असल्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले.
शहराच्या हिमायतबागेतील फळ संशोधन केंद्र परिसरात राज्यस्तरीय कोरडवाहू शेती अभियान कार्यालयाचे उद्घाटन झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. आमदार डॉ. कल्याण काळे, प्रशांत बंब, अतिरिक्त मुख्य कृषी व पणन सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल, कृषी आयुक्त उमाकांत दांगड उपस्थित होते. विखे म्हणाले की, राज्यात ८२ टक्क्य़ांपेक्षा अधिक क्षेत्र कोरडवाहू आहे. पावसाच्या अनियमितपणाचा मोठा परिणाम कोरडवाहू शेतीत पिकांची रचना, उत्पादन व उत्पादकतेवर होतो. कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी शेतीचा शाश्वत विकास करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना स्थैर्य देण्यासाठी दीर्घकालीन धोरण आखण्यावर भर देण्यात येत आहे. डॉ. गोयल म्हणाले की, कोरडवाडू शेती अभियानात जलसंधारणाची कामे महत्त्वपूर्ण असून शेतीतील मातीमधील आद्र्रता वाढविण्यावर भर देणे गरजेचे आहे. कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांनी प्रास्ताविकात औरंगाबादलगतचा मोठा भूप्रदेश कोरडवाहू शेतीचा आहे. औरंगाबाद मध्यवर्ती केंद्र मानून येथे अभियान कार्यालय सुरू केल्याचे सांगितले.
कोरडवाहू शेती अभियानात ३३ जिल्ह्य़ांतील ३४७ तालुक्यांतून प्रत्येकी एका गावाची निवड करण्यात आली. २०१२-१३ पासून राबविण्यात येत असलेल्या या अभियानात ८० कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आला. मूलस्थानी जलसंधारणावर आधारित रब्बी ज्वारी पिकात १६ जिल्ह्य़ांतील ११८ तालुक्यांमध्ये १ लाख ३१ हजार हेक्टर क्षेत्रावर गट प्रात्यक्षिके घेण्यात आली. कोरडवाहू शेती अभियान कार्यक्रम २०१३-१४मध्ये राबविण्यासाठी दीडशे कोटी मंजूर करण्यात आले आहेत. सर्वसाधारणपणे ५०० हेक्टर क्षेत्र असलेल्या गावासाठी प्रतिहेक्टरी ६० हजार रुपयांप्रमाणे ३ कोटी निधी विचारात घेऊन गावांमध्ये मनुष्यबळ विकास, संरक्षित सिंचन सुविधा या घटकांचा समावेश करून कार्यक्रम राबविण्यासाठी एका गावाचा नमुना आराखडा तयार करण्यात आला. कृषी विभागामार्फत पद्मश्री विखे कृषिसेवा, तसेच आदर्श महिला बचत गट पुरस्कार सुरू करण्यात येणार असल्याचेही या वेळी जाहीर करण्यात आले.