दहावी परीक्षेच्या निकालाची टक्केवारीच नव्हे तर तो गुणात्मकदृष्टय़ा उंचावूनही मुंबईत विद्यार्थी उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती मिळविण्यासाठी दुसऱ्या दिवशीपासूनच मोठय़ा संख्येने गर्दी करू लागल्याने ‘राज्य शिक्षण मंडळा’च्या विभागीय कार्यालयाचे अधिकारीही चक्रावून गेले आहेत. पुनर्मूल्यांकनाकरिता अर्ज करण्यापूर्वी उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत मिळविणे आवश्यक आहे. निकालाच्या दुसऱ्याच दिवशी तब्बल ३५० विद्यार्थ्यांनी वाशीच्या मंडळाच्या विभागीय कार्यालयाबाहेर रांग लावून याकरिता अर्ज केले आहेत.मुंबई विभागात शहर, पूर्व व पश्चिम उपनगरे, रायगड आणि ठाणे या जिल्ह्य़ांचा समावेश होतो. या विभागाचा यंदाचा दहावीचा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल चार टक्क्य़ांनी वाढल्याने कधी नव्हे तो नव्वदी पार करणारा ठरला आहे. गेली सात-आठ वर्षे मुंबई विभागाचा निकाल ८७ किंवा ८८ टक्क्य़ांच्या आसपास लागत आला आहे. परंतु, या वर्षी तब्बल ९२.९० टक्के इतका निकाल नोंदवत मुंबईने विक्रमी उच्चांक गाठला होता. आकडय़ात बोलायचे तर यंदा बारावीला मुंबईतून ३,८१,७१५ इतके विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ३,२६,२७५ इतके विद्यार्थी नव्यानेच परीक्षा देणारे होते. त्यापैकी ३,०३,०९९ इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ९० टक्क्य़ांहून अधिक गुण मिळविणाऱ्यांच्या संख्येत तर गेल्या वर्षीच्या तुलनेत १९ टक्क्य़ांची वाढ आहे. परंतु, इतका चांगला निकाल लागूनही विद्यार्थी छायांकित प्रत मिळविण्यासाठी मोठय़ा संख्येने रांगा लावीत असल्याची प्रतिक्रिया मुंबई विभागीय मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पांडे यांनी दिली.
पुनर्मूल्यांकन करवून घेणारे थोडेच
एका विषयाच्या उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी ४०० रुपये इतके शुल्क आकारले जाते. हे शुल्क इतके जास्त असूनही विद्यार्थी मोठय़ा संख्येने उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतींची मागणी करीत आहेत हे विशेष. जे एखाददुसऱ्या विषयात अनुत्तीर्ण झाले आहेत किंवा अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यासारखे वाटणारे विद्यार्थी छायांकित प्रतीसाठी अर्ज करतात. अर्थात छायांकित प्रती मिळालेले सर्वच विद्यार्थी पुनर्मूल्यांकनाकरिता अर्ज करतातच असे नाही. गेल्या वर्षीही ७२८२ विद्यार्थ्यांनी छायांकित प्रती मागितल्या होत्या. त्यापैकी केवळ २४३ विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनाकरिता अर्ज केले होते. तर त्या आधीच्या वर्षी १० हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी छायांकित प्रतीकरिता अर्ज केले होते. त्यापैकी केवळ ३४५ विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनाची मागणी केली होती. अर्थात पुनर्मूल्यांकनाचा अर्ज करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना त्यांना मिळालेल्या छायांकित उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक व महाविद्यालयाच्या प्राचार्याकडून करून घ्यावे लागते. त्यांच्या संमतीनंतरच पुनर्मूल्यांकनाचा अर्ज करता येतो.

बारावीसाठी ३५०० विद्यार्थ्यांचे अर्ज
बारावीचा निकालही यंदा चांगलाच होता. तरीही बारावीकरिता यंदा ३५०० विद्यार्थ्यांनी छायांकित प्रत मिळण्यासाठी अर्ज केले आहेत. अर्थात यापैकी केवळ पाच ते सहा विद्यार्थ्यांना आतापर्यंत पुनर्मूल्यांकनाकरिता अर्ज केले आहेत, असे मंडळाचे सचिव एस. वाय. चांदेकर यांनी सांगितले.