सार्वजनिक बांधकाम विभागातील लाचखोर अभियंते, ओझर येथील विमानतळावर मद्यपार्टीत सहभागी होणारे वरिष्ठ अधिकारी यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सोमवारी गांधीगिरी पध्दतीने या विभागाच्या त्र्यंबक रस्त्यावरील कार्यालयात आंदोलन करण्यात आले. काही दिवसांपूर्वी विभागाच्या एका अभियंत्याला एक लाखाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या पाश्र्वभूमीवर, आंदोलकांनी लाचखोरी संदर्भातील सन्मानपत्र देत दोषींवर तातडीने कारवाईची मागणी केली.
वेगवेगळ्या कारणांमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार सातत्याने चर्चेत आहे. दोन महिन्यांपूर्वी ओझर विमानतळावर ठेकेदाराने दिलेल्या मद्यपार्टीत या विभागाचे अनेक अधिकारी सहभागी झाल्याचे सांगितले जाते. त्यावरून बराच गदारोळ उडाला असला तरी थातुरमातुर कारवाई वगळता फारसे काही घडले नाही. हे प्रकरण ताजे असताना काही दिवसांपूर्वी अभियंता रवींद्र दशपुते एक लाखाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. या पाश्र्वभूमीवर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हंसराज वडघुले यांच्या नेतृत्वाखाली अनोखे आंदोलन करण्यात आले. आपल्या मागण्यांचे निवेदन आंदोलकांनी मुख्य अभियंत्यांना दिले. सार्वजनिक बांधकाम विभागात मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. सतीश चिखलीकर प्रकरणाने त्यावर शिक्कामोर्तब केले. चिखलीकर प्रकरणात जनतेची दिशाभुल करण्यासाठी चौकशी समिती नेमुन तत्कालिन मुख्य अभियंता आणि काही वरिष्ठ अभियंत्यांच्या अनागोंदी कारभाराची चौकशी करण्यात आली. हे प्रकरण शांत होताच त्या संदर्भातील अहवाल बासनात गुंडाळण्यात आला. चिखलीकर प्रकरणाला पुर्णविराम मिळत नाही तोवर दशपुत्रे यांच्या भ्रष्टाचाराचा नवा अध्याय समोर आल्याचे संघटनेने म्हटले आहे.  
बांधकाम विभागातील शेकडो अधिकाऱ्यांनी विमान तळासारख्या संवेदनशील ठिकाणी जाऊन धांगडधिंगा करत विभागाची लक्तरे वेशीवर टांगली होती. या बाबत शेतकरी संघटना दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी म्हणून सातत्याने आंदोलन करत आहे. मद्य पार्टीला परवानगी देणाऱ्या, विमानतळाची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणे अपेक्षित असताना भलत्याच अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याचे दर्शविण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला. परवानगी देणाऱ्या पाटील या अभियंत्यांची राजकीय हस्तक्षेपाने ऐच्छिक बदली करण्यात आली.
या एकंदर घडामोडीमुळे विभागाच्या कार्यशैलीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. चिखलीकर चौकशी अहवालाचे पुढे काय झाले, विमानतळ प्रकरणातील दोषींवर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली.
असाही सन्मान..
सार्वजनिक बांधकाम विभागातील लाचखोर चिखलीकर, दशपुत्रे यामुळे विभागातील भ्रष्टाचार उघडपणे समोर आला आहे. मात्र त्यातील दोषींवर कारवाई करण्याऐवजी त्यात चालढकल होत आहे. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लाचखोरीबद्दल सन्मानपत्र देऊन या विभागाचा गांधीगिरी पध्दतीने सन्मान केला. तसेच शासनाच्या दिशाभूल करणाऱ्या कारवाईचा ‘एप्रिल फुल’ देऊन निषेधही करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onनाशिकNashik
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agitation by swabhimani farmer
First published on: 14-04-2015 at 06:53 IST