हिवाळी अधिवेशनात वेगवेगळ्या प्रश्नांवरून सरकारची कोंडी करण्याची विरोधकांकडून तयारी सुरू असतानाच महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी विभागातील सर्व आमदार येत्या मंगळवारी (दि. १०) विधिमंडळ परिसरात धरणे आंदोलन करणार आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मुंबईतील कार्यालयात आयोजित बैठकीत नियोजित आंदोलनाची दिशा निश्चित झाल्याचे समजते.
दरम्यान, विभागातील विविध प्रश्नांवर गेल्या महिनाभरात दोन वेळा बैठका घेऊन देण्यात आलेल्या इशाऱ्यांची वा निर्णयांची गाडी पुढे ठोस काही न घडता सरकलीच नाही. या पाश्र्वभूमीवर हा तिसरा प्रयोग आता होत आहे. मराठवाडा जनता विकास परिषदेच्या पुढाकारातून गेल्या २५ नोव्हेंबरला आमदार-खासदारांच्या बैठकीचे आयोजन केले होते. अशोक चव्हाण, पालकमंत्री डी. पी. सावंत यांच्यासह विभागातील १५ आमदार या बैठकीला हजर होते. जायकवाडीच्या हक्काच्या पाण्यासह विभागातील अन्य प्रश्नांवर आमदारांनी आपली मते नोंदविली. त्यानंतर ७ महत्त्वाच्या मुद्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचे ठरले होते.
याच बैठकीत झालेल्या निर्णयानुसार अशोक चव्हाण यांच्या कार्यालयात बुधवारी आयोजित बैठकीला काही आमदार उपस्थित होते. अधिवेशनात कोणी कोणते प्रश्न मांडावेत, याबद्दलचे नियोजन बैठकीत करण्यात आले. मजविपतर्फे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश काब्दे, तसेच या. रा. जाधव उपस्थित होते. परंतु बैठकीतील चर्चेची अधिकृत माहिती तेथे देण्यात आली नाही.
चव्हाण यांनी विभागातील आमदारांच्या समन्वय समितीतील प्रशांत बंब, पंकजा पालवे, बंडू जाधव, अमरनाथ राजूकर, विक्रम काळे यांना आमंत्रित केले होते. विविध विषयांवर चर्चा झाल्यानंतर आमदारांनी १० डिसेंबरला धरणे आंदोलन करावे, असे ठरल्याचे समजते. नांदेडच्या काही आमदारांना बैठकीचा सुगावा लागल्यानंतर वसंतराव चव्हाण, ओमप्रकाश पोकर्णा व हणमंतराव बेटमोगरेकर हेही बैठकीत सहभागी झाले.
दरम्यान, विभागावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यास राज्यपालांची भेट घेण्याचे २५ नोव्हेंबरच्या बैठकीत ठरले होते; परंतु त्याचे पुढे काय झाले, ते कळले नाही. आमदारांच्या तीव्र भावना मुख्यमंत्र्यांच्या कानी घालण्याची ग्वाही पालकमंत्री सावंत यांनी या बैठकीतच दिली होती. त्याचे पुढे काय झाले तेही कळले नाही. मुख्यमंत्री मराठवाडय़ातल्या आमदारांना पाचारण करणार का, तेही समजू शकले नाही आणि आता १० डिसेंबरला होणाऱ्या धरणे आंदोलनाची अधिकृत घोषणाही झाली नाही. मजविपचे अध्यक्ष काब्दे बुधवारी मुंबईत होते, तेथून ते बंगळूरला रवाना झाले. बैठकीतील चर्चा गोपनीय ठेवावी, असे ठरले होते; पण एका आमदाराने धरणे आंदोलनाची माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agitation for marathwada problems
First published on: 07-12-2013 at 01:48 IST