शहरातील अभयसिंह राजेंद्र फाळके हे केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी सकाळी राजेंद्र फाळके यांच्या घरी येऊन सत्कार करतानाच त्याचे तोंडभरून कौतुक केले.
जिल्हा परिषदेचे सदस्य राजेंद्र फाळके यांनी पवार यांचे स्वागत केले. पालकमंत्री बबनराव पाचपुते, आमदार सुरेश धस, विक्रम पाचपुते, काकासाहेब तापकीर, नितीन धांडे, जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अगरवाल आदी यावेळी उपस्थित होते.
 पवार म्हणाले, ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले यश मिळवू लागले आहेत. स्पर्धेतील हे बौध्दिक यश वाखाणण्याजोगे आहे. अभयसिंह फाळके याने मोठय़ा कष्टाने हे यश मिळवले, मात्र येथेच न थांबता आणखी प्रगती करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  
सत्काराच्या औपचारिक कार्यक्रमानंतर मात्र पवार यांनी कर्जत शहरातील रस्त्यावरील अडथळ्यांबद्दल अधिका-यांना चांगलेच फटकारले. सुशोभीकरणाच्या नावाखाली रस्त्याच्या मधोमध उभारण्यात आलेले हे खांब रहदारीला धोकादायक असून ते तातडीने काढून टाकण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. अतिक्रमणे काढताना व्यापा-यांचे पुनर्वसन करण्याचेही आवाहन त्यांनी केले. कर्जत-राशिन रस्त्यावरील घाणीच्या साम्राज्याबद्दलही पवार यांनी तीव्र शब्दांत नापसंती व्यक्त केली. तुमच्या गावापर्यंत स्वच्छता अभियान पोहोचलेले दिसत नाही, असा टोला लगावत याबद्दलही त्यांनी कानउघडणी केली.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar admired to abhay singh phalke
First published on: 14-05-2013 at 01:47 IST