घराघरांभोवती वृक्षारोपण..आजपर्यंत ५० हजारापेक्षा अधिक वृक्षांचे संगोपन..नाशिकच नव्हे तर जिल्ह्यातील इतर शहरांमध्येही पर्यावरणाचा प्रसार..अपघातग्रस्त जखमी पक्ष्यांवर उपचार..चिऊताईला हक्काचे घर मिळावे म्हणून पाच हजारपेक्षा अधिक घरटय़ांचे मोफत वाटप..
इतकं सर्व काही केवळ पर्यावरण प्रेम पूरेपूर अंगात भिनलेली व्यक्तीच करू शकते. अलिशान गाडी, भव्य बंगला, परदेश प्रवास असे स्वप्न तर सर्वच जण पाहतात. परंतु नाशिकमधील वृक्षप्रेमी व पक्षीमित्र शेखर गायकवाड यांचे स्वप्न इतरांपेक्षा वेगळे आहे. नाशिकसह जिल्ह्यातून दिवसेंदिवस हिरवाई कमी होत असल्याने ती पुन्हा फुलविण्यासाठी गायकवाड यांनी ‘हिरवे स्वप्न’ पाहिले असून त्यांच्या या कार्याची दखल घेत मायको एम्प्लॉईज फोरमच्या वतीने त्यांना मानव सेवा पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे.
नाशिकमधून नष्ट होत चाललेला धरणीचा हिरवा साजशृंगार तिला परत मिळवून देण्याचा त्यांचा ध्यास आहे. हे स्वप्न साकारण्यासाठी ते अविरत परीश्रम स्वखर्चाने घेत असून त्यासाठी त्यांना काही पर्यावरण प्रेमींकडून साथ मिळत आहे. पर्यावरण संरक्षण व संवर्धन याविषयी अनेक मान्यवरांकडून व्याख्याने दिली जातात. परंतु केवळ व्याख्यान देण्यापेक्षा स्वत: काहीतरी करून दाखविणे हे हितावह मानत गायकवाड यांनी जणूकाही पर्यावरणासाठी स्वत:ला वाहून घेतले आहे. पर्यावरण हितासाठी काय करता येणे शक्य आहे, या विषयी ते हरप्रकारे वेगवेगळ्या योजना मांडत असतात. पर्यावरण प्रेमी नागरिकांच्या सहकार्याने या योजनांची अंमलबजावणीही करत असतात.
पहाटेपासून वृक्षारोपण व संगोपनाने त्यांचा दिनक्रम सुरू होतो. सोबतीला असते त्यांची मोटारसायकल, कुदळ, फावडे आणि उत्स्फूर्तपणे सहकार्य करणारे युवक-युवती. पालिकेच्या मोकळ्या उजाड जागांवर हिरवळ निर्माण करणे, पर्यावरण प्रेमी नागरिकांच्या सहकार्याने त्यांच्या घराभोवती वृक्षारोपण करणे व संगोपनाच्या जबाबदारीचे आश्वासन समोरच्या व्यक्तीकडून घेणे, पक्ष्यांना उपयुक्त तसेच पारंपरिक महत्व असलेल्या व दुर्मीळ अशा वृक्षांना लागवडीसाठी प्राधान्य देण्यात येत असून आजपर्यंत ५० हजारपेक्षा अधिक वृक्षांचे संगोपन या वृक्षपित्याने फक्त नाशिक नव्हे तर, सिन्नर, सटाणा, पेठ अशा परिसरातही केले आहे. एवढेच नव्हे तर अपघातग्रस्त जखमी पक्ष्यांवर उपचार करून ते पुन्हा उडण्याइतपत तंदुरुस्त होईपर्यंत त्यांची देखभालही गायकवाड हे करत असतात. आधुनिक युगात वाढत्या लोकवस्तीसाठी इमारती उभारण्याकरिता असंख्य बिल्डर आहेत, पण चिऊताईच्या घराची काळजी घेणारे गायकवाड यांच्यासारखे पक्षीप्रेमी विरळाच. चिऊताईला हक्काचे घर देण्यासाठी त्यांनी पाच हजारांहून अधिक घरटय़ांचे मोफत वाटप केले आहे.
जल प्रदुषणामुळे गोदावरीची होणारी हानी रोखण्यात यावी, तिचे रक्षण व्हावे म्हणून गणेशोत्सवा दरम्यान त्यांनी स्वत: मूर्ती दान या संकल्पनेतून मूर्ती व निर्माल्य जमा केले. निसर्गापासून दूर होत चाललेल्या सर्वाना ते ‘आता फक्त एकच चळवळ, लावा वृक्ष, करा हिरवळ’ असे सांगतात. नाशिकमध्ये हरित चळवळ निर्माण करणाऱ्या गायकवाड यांच्यामधील उत्साह पाहून अनेक युवक-युवती त्यांच्या कार्यासाठी स्वत:हून पुढे येत आहेत.
विशेष म्हणजे गायकवाड हे युवकांशी समरस होत असल्याने त्यांना ते मित्रच वाटतात. युवकांकडून शिस्तीने काम करवून घेण्यासह ते त्यांना शाबासकी देत असतात. युवावर्गात ‘शेरू काका’ म्हणून प्रसिध्द असलेल्या शेखर गायकवाड यांच्या कार्याची प्रेरणा सर्वानी घेण्याची गरज आहे.