सोनई येथे झालेल्या तीन दलित कर्मचाऱ्यांच्या हत्याकांडात पोलिसांकडून आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याची टिका आज मेहतर वाल्मिकी समाजाच्या वतीने घटनास्थळी भेट देण्यासाठी आलेल्या जलसंधारण व रोजगार हमी योजना मंत्री नितीन राऊत यांच्याकडे करण्यात आली. हत्या झालेल्या कुटुंबांचे पुर्नवसन करावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
माजी नगराध्यक्ष दिप चव्हाण यांनी हा आरोप केला. समाजकल्याण आयुक्त आर. के. गायकवाड, माजी आमदार जयंत ससाणे तसेच ब्रिजलाल सारडा, नगरसेवक धनंजय जाधव, विनायक देशमुख, उबेद शेख, भास्करराव डिक्कर आदी यावेळी उपस्थित होते.
सोनई येथे महिनाभरापुर्वी झालेल्या या निर्घृण हत्याकांडाच्या घटनास्थळी मंत्री राऊत यांनी आज भेट दिली व संबधितांशी चर्चा करून पोलिसांना व्यवस्थित तपासाचे आदेश दिले. त्यानंतर ते नगरमध्ये सरकारी विश्रामगृहावर आले असताना समाजाच्या वतीने दिप चव्हाण, प्रा. किसन चव्हाण तसेच समाजाचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी राऊत यांची भेट घेण्यासाठी आले होते.
चव्हाण यांनी सांगितले की घटना ३१ डिसेंबरला घडली. १ जानेवारीला अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर दि. २ ला खुनाचा गुन्हा दाखल झाला. दि. ५ ला दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याची कलमे लावण्यात आली. एकूण ५ आरोपी पकडले. त्यातील पहिल्या तिघांना ७ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. नंतरच्या दोघांना तर तीनच दिवसांची मिळाली. त्यानंतर लगेचच त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली. हत्याकांडासारख्या गंभीर गुन्ह्य़ात पोलिसांकडूनच ही चालढकल सुरू आहे. पोलिसांनी किंवा त्या वकिलाने न्यायालयात पोलीस कोठडी वाढवून द्यावी अशी साधी मागणीही केली नाही. आरोपी फक्त ५ जण नाहीत तर आणखीही आहेत. तरीही पोलिस हत्याऱ्यांचा शोध घेत नाहीत. आणखी कोण आरोपी आहेत त्याची चौकशी करत नाहीत असा ठाम आरोप चव्हाण यांनी केला.
राऊत यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. सरकार योग्य ती कार्यवाही करत आहे, सीआयडी चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे मांडू, सध्याचा तपास योग्य पद्धतीने सुरू आहे, काही गैरप्रकार होत असतील तर त्याची चौकशी करून संबधितांवर कारवाई करू असेही राऊत यांनी सांगितले.