वाहनाची धडक बसून हरीण जखमी होऊन रस्त्यावर पडले. रात्रीची वेळ असल्याने रस्त्यावर ये-जा करणाऱ्या वाहनांच्या गर्दीत त्याची मदतीची याचना ती कोण ऐकणार? याच वेळी लातूरकडे येत असलेल्या दोघा मित्रांनी या हरणाला आपल्या मोटारीत टाकले आणि १०० क्रमांकावर दूरध्वनी केल्यावर पोलिसांनीही चांगला प्रतिसाद दिला. वेळीच मदत मिळाल्याने त्या हरणाला जीवदान मिळाले..
सन १९७२च्या दुष्काळालाही मागे टाकणारा भीषण दुष्काळ आताचा असून पिण्याच्या पाण्यासाठी माणसांपेक्षा किती तरी वन्यप्राण्यांची अधिक परवड होत आहे. रात्री-बेरात्री पाण्याच्या शोधात हे प्राणी निघतात. बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास औसा-लातूर रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे एक हरीण जखमी झाले. रस्त्यावर वाहतूक मोठय़ा प्रमाणात असूनही या जखमी हरणाच्या मदतीसाठी कोणी धावून येत नव्हता. लातूरचे संजय राजहंस व शशांक मुळे हे दोघे मित्र सोलापूरहून स्वत:च्या खासगी वाहनाने लातूरकडे येत होते. रस्त्यातील गर्दी पाहून त्यांनी वाहन थांबवून घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेतील हरीण पाहून त्याला उचलून आपल्या मोटारीत टाकले. तातडीने १०० क्रमांकावर दूरध्वनी करून पोलिसांना माहिती दिली. दूरध्वनीवरून बोलणाऱ्या पोलिसांनी या वेळी त्यांना, हरणाला पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन जा, तोपर्यंत अन्य यंत्रणेला दूरध्वनीवरून माहिती देतो, असे सांगितले.
औसा पोलीस ठाण्याहून वनरक्षक प्रकाश जोशी व जी. जी. इगवे माहिती मिळताच घटनास्थळी आले. मोटारीत ठेवलेले हरीण रस्त्यावरील वाहनांच्या उजेडामुळे गांगरले होते. त्यामुळे वाटेत मुळे यांनी कारंजे खडी केंद्राजवळ वाहन थांबवून चादर मागवून घेऊन हरणाचे डोळे बांधले.
लातूरकडे येत असतानाच त्यांच्याशी परिचित असणारे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गोदाजी यांना त्यांनी दूरध्वनीवरून हरणाच्या अपघाताची माहिती दिली व गोदाजीही औषध घेऊन निघाले. दरम्यान, वनरक्षक प्रकाश जोशी यांचा दूरध्वनी शोधून काढून संजय राजहंस यांनी त्यांना माहिती दिली. जोशी हे राजहंस यांच्याकडे पोहोचेपर्यंत डॉ. गोदाजी यांनी हरणावर प्राथमिक उपचार केले. नंतर ते जोशी यांच्या ताब्यात देण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: And that deer life saved
First published on: 11-01-2013 at 01:54 IST