राज्याचा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सध्या पूर्वी कधीही नव्हता इतका सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. विभागाचा प्रमुख बदलल्यानंतर त्याच्या कार्यपद्धतीने सारा विभाग ढवळून निघाला असून राज्यभरात केवळ चार महिन्यांतच वर्षभरात होत असलेल्या कामगिरीजवळ हा विभाग पोहोचला आहे. जानेवारीपासून १२ मेपर्यंत ३८८ सापळे यशस्वी झाले असून हा देखील या विभागाच्या कारकिर्दीतील विक्रम असल्याचे बोलले जात आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागात नियुक्ती ही एक प्रकारे शिक्षा मानली जाते. कमी महत्त्वाच्या या विभागात काम करताना स्वत:ची तुंबडी भरण्यासाठी लाचखोर अधिकाऱ्यांना सापळ्याआधी ‘टीप’ दिली जात असे. अशा अधिकाऱ्यांवर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे या विभागाची कामगिरी फारशी नेत्रदीपक नव्हती. मात्र कर्तव्यदक्ष अधिकारी प्रवीण दीक्षित यांनी या विभागाच्या महासंचालकपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर उत्साह आल्याप्रमाणे हा विभाग कार्यान्वित झाला आहे. लाचखोरांविरुद्धकारवाईचा हाच वेग कायम राहिला तर पहिल्या सहा महिन्यांतच वर्षभराची कामगिरी हा विभाग पार पाडू शकणार आहे. गेल्या वर्षी ५८३ सापळे यशस्वी झाले होते. १२ मेपर्यंतची या विभागाची कारवाई पाहता त्यात फक्त २०१ सापळ्यांची घट आहे. परंतु गेल्या काही दिवसांतील प्रतिदिन तीन ते चार सापळे पाहता यंदा हा विभाग विक्रम करील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अनेक पदे रिक्त असतानाही ही कामगिरी कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. लाचखोरांवर होणारी कारवाई पाहून तक्रारींचा ओघही वाढू लागल्याची माहिती या विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. यापैकी अनेक तक्रारी या महापालिका, म्हाडा, महसूल तसेच पोलीस विभागाशी संबंधित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या सर्व तक्रारींचा आढावा घेतला जात असला तरी सापळा रचण्यासाठी संबंधित तक्रारदार पुढे येणे आवश्यक असते. त्यामुळे लाच देण्याऐवजी त्याविरुद्ध तक्रार करा, असे आवाहन महासंचालक दीक्षित यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anti corruption success 388 traps
First published on: 17-05-2014 at 01:04 IST