कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष असल्याचे भासवून व आपल्या पदाचा गैरवापर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी आनंदराव पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा व सातारा पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास करण्यात यावा यासाठी सामाजिक कार्यकत्रे सुशांत मोरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पाटील यांची २४ आक्टोबर २००८ रोजी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणून एक वर्षांच्या कालावधीसाठी नेमणूक करण्यात आली होती. या पदाचा दर्जा राज्यमंत्र्यांच्या बरोबरीचा असून  त्यांना मंत्र्यांप्रमाणेच या उपाध्यक्षांना लाल दिव्याची गाडी, सर्व भत्ते तसेच सर्व शासकीय सेवा सुविधा दिल्या जातात.  २३ आक्टोबर २००९ ला पाटील यांची या पदाची मुदत संपलेली होती. शासनाकडून त्यांना कोणतीही मुदतवाढ देण्यात आलेली नव्हती. यानंतर वल्लभ बेणके यांची यापदावर निवड झाली.
मुदत संपल्यानंतरही हेतूपूर्वक सुमारे तीन वर्ष लाल दिव्याची गाडी आपल्याकडे ठेवून मंत्र्याच्या थाटात राज्यात वावरले. सर्व सोयीसुविधा वापरल्या, शासकीय बठकांना हजेरी लावली, तेथील भत्ते स्वीकारले, लेटरहेडचा दुरुपयोग केला. या विषयी सामाजिक कार्यकत्रे सुशांत मोरे यांनी माहिती घेतल्यावर व ती प्रसिध्द झाल्यावर घाईगडबडीने लाल दिव्याची गाडी वापरणे  व सुविधा घेणे बंद केले. याबाबत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र आनंदराव पाटील हे मुख्यंमंत्र्यांचे जवळचे सहकारी असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नव्हती म्हणून त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला आहे. याप्रकरणात मोरे यांना धमक्या येत असल्याने त्यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. असेही त्यांनी पत्रकारांना सांगितले.