यावर्षी व्हॅलेंटाइन डे शनिवारी आल्यामुळे अनेकांना सुट्टी आहे. यामुळे या दिवसाचे नियोजन झाले असेलच. या नियोजनामध्ये किंवा हा दिवस अविस्मरणीय ठरावा यासाठी तुम्हाला तुमचा मोबाइल अधिक मदत करू शकतो. तुमच्या स्मार्टफोनमध्ये असे अनेक अ‍ॅप्स आहेत की ज्याच्या मदतीने तुम्ही हा व्हॅलेंटाइन डे आगळ्या पद्धतीने एन्जॉय करू शकता. पाहुयात यातील काही खास मोफत अ‍ॅप्स.
लव्ह टेस्ट कॅल्क्युलेटर
तुम्हाला एखादी मैत्रीण किंवा मित्र आवडतो. पण तुम्ही त्याच्याबरोबर किती कन्फर्ट असू शकता याचा अंदाज तुम्हाला येत नाही. अशा वेळी हे अ‍ॅप तुम्हाला मदत करू शकते. या अ‍ॅपमध्ये आनंद, विश्वास आणि निष्ठा या तीन प्रमोतील महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी साठ प्रश्नांची एक परीक्षा आहे. ही परीक्षा त्या संबंधित व्यक्तीला द्यायला सांगा. यानंतर यात समर चॅलेंज नावाचा एक गेम आहे हा गेम दोघांनी मिळून खेळणे आवश्यक आहे. हे सर्व झाल्यावर अ‍ॅप तुम्हाला तुमच्या नात्याचे मूल्यांकन देते. याच्या आधारे तुम्हाला योग्य तो निर्णय घेण्यास कदाचित मदत होऊ शकते.
अ‍ॅप : अँड्रॉइड, आयओएस आणि विंडोज ओएसवर  उपलब्ध आहे.
लव्ह लेटर
व्हॅलेंटाइन डेच्या आदल्या रात्री अगदी बारा वाजल्यापासून संदेश पाठविणे, मोबाइलवरून गुलाबाची फुले, चॉकलेट्स, कविता पाठविणे हे आपण अगदी न चुकता करत असतो. पण यावेळी जरा हटके काही करायचे असेल आणि तुमच्या जोडीदाराला खूप खूष करायचे असेल तर तुम्ही लव्ह लेटर लिहू शकता. यासाठी हे अ‍ॅप तुम्हाला मदत करते. या अ‍ॅपमध्ये प्रेमाशी संबंधित काही महत्त्वाची वाक्य, प्रमाचे प्रतीक म्हणूून ओळखले जाणाऱ्यांचे प्रेमळ संवाद देण्यात आले आहेत. याचा वापर करून तुम्ही एक छानसे पत्र लिहू शकता. इतकेच नव्हे तर या अ‍ॅपमध्ये काही स्वभावाशी संबंधित वाक्यही देण्यात आली आहेत. याचा वापर करून तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या स्वभावाचे कौतुकही पत्रामध्ये करू शकता.
अ‍ॅप : अँड्रॉइड, आयओएस आणि विंडोज ओएसवर उपलब्ध आहे.
व्हॅलेंटाइन टेक्टर
इकडून तिकडून आलेले संदेश फॉरवर्ड करण्यामध्ये आपण सर्वच जण व्हॉट्सअ‍ॅपमुळे माहिर झालो आहोत. पण जर मार्केटमध्ये नवीन संदेश पाठवायचा असेल तर तुमच्यासाठी अ‍ॅप मार्केटमध्ये व्हॅलेंटाइन डेनिमित्त चांगल्या प्रकारचे संदेश पुरविणारे अ‍ॅप्स आहेत. यामध्ये व्हॅलेंटाइन टेक्सटर, व्हॅलेंटाइल एसएमएस, व्हॅलेंटाइन डे कार्डस अशा अ‍ॅप्सचा समावेश आहे. या अ‍ॅप्सच्या माध्यमातून तुम्हाला एका क्लिकवर संदेश पाठविता येणे शक्य होणार आहे. यासाठी तुम्हाला अ‍ॅप इंस्टॉल केल्यावर त्यामध्ये तुमच्या जोडीदाराचा किंवा प्रिय व्यक्तींचा नंबर सेव्ह करावयाचा असतो. हा नंबर सेव्ह केल्यानंतर तुम्हाला अ‍ॅपमध्ये असलेला संदेश पाठविण्यासाठी कॉपी पेस्ट करावयाची गरज भासणार नाही.
अ‍ॅप : अँड्रॉइड, आयओएस आणि विंडोज ओएसवर उपलब्ध आहे.
व्हॅलेंटाइन फोटो फ्रेम
तुमचा आणि तुमच्या जोडीदाराचा एखादा खास फोटो असेल जो तुम्हा दोघांनाही खूप आवडतो. असा फोटो तुम्ही चांगला सजवून जर भेट दिला तर तुमचा व्हॅलेंटाइन नक्कीच चांगला साजरा होऊ शकतो. हा फोटो फ्रेम करण्यासाठी त्याची प्रिंट काढण्याची गरज नाही किंवा फोटो फ्रेमच्या दुकानातही जाण्याची गरज नाही. खास व्हॅलेंटाइन डेच्या मूडला साजेशा अशा फोटो फ्रेम्सची विविध अ‍ॅप्स अप बाजारात उपलब्ध आहेत. यातील फोटो फ्रेम्ससोबत काही संदेशही लिहिलेला असतो. फोटो फ्रेम तुम्हाला आवडेल ती निवडून त्यावर तुम्हाला आवडेल तो संदेश लिहून तुम्ही फोटो फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ई-मेल आदी माध्यमातून शेअर करू शकता.
अ‍ॅप : अँड्रॉइड्र, आयओएस आणि विंडोज ओएसवर उपलब्ध आहे.
(ओएसनुसार अ‍ॅपच्या पर्यायांमध्ये थोडेफार बदल असू शकतात. )
नीरज पंडित, मुंबई

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Apps help make valentines day easier
First published on: 07-02-2015 at 12:04 IST