प्रशासकीय बदल्या टाळण्यासाठी अपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या ७८ प्राथमिक शिक्षकांपैकी १० जणांना आज अटक करण्यात आली, त्यांना न्यायालयाने चार दिवस (दि. १०) पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. त्यामध्ये ६ शिक्षिका व ४ शिक्षकांचा समावेश आहे.
शिक्षणाधिकाऱ्यांच्या फिर्यादिनुसार कोतवाली पोलिसांनी ७८ शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. सुवर्णा अकोलकर, संगीता जाधव, रेश्मा सोनवणे, भिमाजी लोंढे, योजना काकड, ललीता जाधव, नाथू मुठे, विद्या राऊत, बबन देवडे व महादेव देवडे यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला.
गुन्हा दाखल केल्यानंतर या दहा जणांसह २५ शिक्षकांचा अटकपूर्व जामिन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला होता, नंतर या शिक्षकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती, उच्च न्यायालयाने त्यांना १५ दिवसांसाठी दिलासा दिला. हा कालावधी संपल्यानंतर वरील दहा शिक्षक शनिवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे हजर झाले. न्यायालयाने पोलिसांचे म्हणणे मागवत दोन दिवसांचा १५ हजार रुपयांचा तूर्त जामीन दिला. त्यामुळे हे १० शिक्षक पुन्हा आज न्यायालयापुढे हजर झाले.
कोतवाली निरीक्षकांनी या शिक्षकांची पोलीस कोठडी आवश्यक असल्याची विनंती न्यायालयास केली. सरकारतर्फे सरकारी वकील श्रीमती बडे व आरोपी शिक्षकांच्या वतीने वकील विवेक म्हसे यांनी युक्तीवाद केला. त्यानंतर दहाही जणांना पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला.