भुईंज ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बाळासाहेब कांबळे, तर उपसरपंचपदी अनुराधा भोसले यांची बिनविरोध निवड झाली.
भुईंज ग्रामपंचायतीची नुकतीच निवडणूक झाली होती. किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांच्या नेतृत्वाखालील महालक्ष्मी पॅनेलने १७ जागांपैकी १६ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले होते. एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत उमेदवाराने जिंकली आहे.
आज सरपंचपदासाठी बाळासाहेब ऊर्फ बा. को. कांबळे यांचा व उपसरपंचपदासाठी अनुराधा भोसले यांचा एकच अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रकांत राऊत यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे सांगितले.
या वेळी माजी सरपंच अर्जुन भोसले यांनी आपल्या कारकीर्दीचा आढावा घेतला. कांबळे यांनीही गावातील सामाजिक व सांस्कृतिक एकी कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले आणि मदन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली गावात अनेक उपक्रम राबवण्याची ग्वाही त्यांनी दिली. यानंतर सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी प्रतापराव भोसलेंची भेट घेतली. या वेळी राजनंदा जाधवराव, जयवंत पिसाळ, किशोर रोकडे, आदी ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते. उपसरपंच अनुराधा भोसले या प्रतापराव भोसले यांच्या धाकटय़ा स्नुषा आहेत.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balasaheb kamble and anuradha bhosale elected in bhuinj gram panchayat
First published on: 09-12-2012 at 08:56 IST