फुलंब्रीचे तहसीलदार रेवणनाथ लबडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांना रोशन अवसरमल यांनी जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकाराचा महसूल अधिकारी व कर्मचारी महासंघाने गुरुवारी मोर्चा काढून निषेध केला. सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दमदाटी करून दहशत निर्माण करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खचत असल्याचे कर्मचाऱ्यांनी विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
फुलंब्री तालुक्यातील डोंगरगाव येथील त्र्यंबक डकले यांचे क्रशर तातडीने बंद करावे, अशी मागणी रोशन अवसरमल याने केली होती. क्रशरधारकाने रॉयल्टीची रक्कम भरली होती. त्यामुळे कारवाई करता येणार नसल्याचे तहसीलदारांनी स्पष्ट केले. अवसरमल  मात्र कारवाईस आग्रही होते. बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास कार्यालयाबाहेर पडत असताना तहसीलदार लबडे यांच्या तोंडावर शाई फेकून त्यांना मारहाण करण्यात आली, जिवे मारण्याची धमकीही दिली. अशा प्रकरणांमध्ये विभागीय आयुक्तांनी लक्ष घालावे. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात कायमस्वरूपी दोन पोलीस कर्मचारी अथवा सुरक्षारक्षकांची नियुक्ती करावी. महसूल विभागात प्रत्येक शाखेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, तसेच लबडे   यांना    पोलीस संरक्षण द्यावे, अशी  मागणी करण्यात आली.
निवेदनावर राजपत्रित महासंघाचे अध्यक्ष डॉ. भारत कदम, महसूल कर्मचारी संघटनेचे डी. एम. देशपांडे, सतीश तुपे, तहसीलदार संघटनेचे अध्यक्ष बालाजी क्षीरसागर, जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे बी. डी. म्हस्के आदींच्या सह्य़ा आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beating to sub divisonal magistrate
First published on: 15-03-2013 at 01:33 IST