जनमानसावर ज्या माध्यमाचा सर्वात जास्त प्रभाव पडतो त्या चित्रपट माध्यमाची सर्व अंगे पडताळून पाहण्याचा एक प्रयत्न अंधेरीच्या भवन्स महाविद्यालयाचे विद्यार्थी करतात. चित्रपटसृष्टीत प्रयोगशीलतेची किरणे आणणाऱ्या सत्यजित रे यांच्या नावाने भवन्स महाविद्यालयातील बीएमएमचे विद्यार्थी ‘रे फिल्म फेस्टिव्हल’चे आयोजन करतात. हा महोत्सव या वर्षीही धूमधडाक्यात सुरू झाला असून १९ डिसेंबपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात पटकथा लेखन, लघुपट स्पर्धा, चित्रपट संगीत कार्यक्रम, बॉलीपीडिया यांसारख्या अभिनव संकल्पनांवरचे सादरीकरण प्रत्यक्ष अनुभवायला मिळणार आहे.
‘रे फिल्म फेस्टिव्हल’ दरवर्षी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलावंतांना समर्पित केला जातो. या वेळी चित्रपटसृष्टीचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांना सलामी देण्यात येणार असल्याची माहिती महोत्सवाचे आयोजक श्रवण अजय यांनी दिली. दिग्गज कलावंतांप्रती आपला आदर व्यक्त करताना या माध्यमातील प्रतिभावान तरुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न ‘रे फिल्म फेस्टिव्हल’च्या माध्यमातून केला जातो असेही श्रवण अजय यांनी सांगितले. अभिनेता राजेश खन्ना यांनी साकारलेल्या रोमॅण्टिक नायकाची आठवण काढताना त्यांच्यावर चित्रीत झालेली अनेक बहारदार गाणी आपल्या डोळ्यांसमोर तरळतात.
‘रूप तेरा मस्ताना’ या त्यांच्या सदाबहार गाण्याचे शीर्षक घेऊन आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत एकाच वेळी दोन वेगवेगळ्या भावनांचे रंग कॅनव्हासवर उतरविण्याचे आव्हान स्पर्धकांना पेलायचे आहे. याशिवाय ‘रे फिल्म फेस्टिव्हल’मध्ये सहभागी होण्यासाठी बॉलीवूडचा एनसायक्लोपीडिया अवगत असणे ही प्राथमिक गरज असणार आहे.
अन्यथा बॉलीपीडिया यासारख्या अनोख्या स्पर्धेला उतरणे विद्यार्थ्यांसाठी मोठी अवघड कामगिरी ठरेल. ‘सबकुछ’ फिल्मी असणाऱ्या या महोत्सवात ‘लाईफ इन मिनिट’ नावाची लघुपट स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे परीक्षण बॉलीवूडचे नामवंत कलावंत करणार आहेत.
‘मिस्टर अॅण्ड मिसेस रे’, ‘सीधी बात नो बकवास’ अशा चित्रविचित्र नावांच्या स्पर्धामधून स्पर्धकांना आपले ‘फिल्मी’ कौशल्य पणाला लावता येणार आहे. विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी आणि तेही पूर्णत: चित्रपटांवर आधारित असलेले ‘रे फिल्म फेस्टिव्हल’ हे अन्य महाविद्यालयीन महोत्सवांमधील एक वेगळा प्रयत्न आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhavans college ray film festival
First published on: 18-12-2013 at 07:57 IST