पक्षीमित्र व शिक्षक जयराम श्रीरंग सातपुते यांनी संक्रातीच्या औचित्याने स्थापन केलेल्या विद्यार्थ्यांच्या ‘बर्ड हेल्पलाईन’ पथकांनी पतंगांच्या मांज्यात अडकलेल्या, त्यामुळे जखमी झालेल्या पक्ष्यांना मुक्त केले, तसेच त्यांच्यावर उपचारही केले. या उपक्रमामुळे अभ्यासक्रमात अंतर्भूत असलेल्या निसर्गसंवर्धन व प्राणीमात्रांवर दया करा या मुल्यांची विद्यार्थ्यांत रुजवणूक होण्यास मदत झाली. गेल्या ५ वर्षांपासून ते हा उपक्रम राबवत आहेत.
मकर संक्रांत आणि पतंग यांचे अतूट नाते असले तरी पतंगाच्या मांज्यामुळे ‘संक्रांत’ येते ती निसर्गाचा महत्वपूर्ण घटक असणाऱ्या पक्ष्यांवर. काचेच्या चुऱ्याचे लेपन देऊन तयार केलेल्या हा धाग्यात (मांजा) अडकून पक्षी जखमी, घायाळ होतात, त्यात अडकलेले पक्षी बराच काळ झाडांवर अडकून नंतर तेथेच शेवटचा श्वास घेतात. पतंगाच्या या दुष्परिणामांची जाणीव अनेक वेळा पक्षीमित्र संघटनेने करुन दिली तरी पक्ष्यांच्या त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढतच आहे.
ही बाब लक्षात घेऊन भिंगार येथील पक्षीमित्र जयराम सातपुते यांनी यंदा एक वेगळा उपक्रम राबवला. सातपुते जिल्हा परिषदेच्या तिसगाव (ता. पाथर्डी) शाळेत शिक्षक आहेत. त्यांनी आपल्या नगर व पाथर्डी भागातील विद्यार्थ्यांची ‘बर्ड हेल्पलाईन’ची पथके उभारली. त्यात सफाईदारपणे झाडांवर चढ-उतार करु शकणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश केला. या विद्यार्थ्यांनी झाडात अडकलेल्या जखमी पक्ष्यांवर उपचार करुन त्यांना मुक्त केले.
सातपुते राज्य पक्षीमित्र संघटनेचे सदस्य आहेत. संघटनेच्या वतीने यंदा महापक्षीगणना- २०१३चे आयोजन करण्यात आले आहे. ही गणना दि. १९ ते २७ जानेवारी दरम्यान होणार आहे. त्यामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी, शिक्षकांनी मो. ९६०४०७४७९६ किंवा मो. ८४८५०८७९८२ यावर संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bird helpline start on occaion of makar sankrant
First published on: 15-01-2013 at 02:26 IST