भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष बोरकर यांना आधारकार्ड नोंदणीमधील अनागोंदीच्या कारभाराबाबत भेटून निवेदन दिले. या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष महेश जाधव, नगरसेवक आर. डी. पाटील, विजय जाधव, अ‍ॅड. संपतराव पवार, अशोक देसाई, प्रभाताई टिपुगडे, सुभाष रामुगडे, किशोर घाटगे यांच्या समावेश होता.    
निवेदनात म्हटले आहे, की केंद्र शासनाच्या वतीने आधारकार्ड नोंदणीची मोहीम २०११ पासून सुरू करण्यात आली होती. कोल्हापुरात १७ जानेवारी २०११ पासून या योजनेची सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात टेरा सॉफ्टवेअर हैदराबाद व महाऑनलाईन या कंपन्यांना याचा ठेका देण्यात आला होता. पण या वेळी मोठय़ा प्रमाणात गोंधळ उडाला होता. नागरिकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत होते. अजूनही अनेक नागरिकांना नोंदणी करूनदेखील आधार कार्ड मिळालेले नाही व पोस्ट खात्याकडून ही नोंदणी सुरू होती तीदेखील बंद झाली आहे.    
आता केंद्र शासनाने आधार कार्ड नोंदणीचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. परंतु अजूनही कोल्हापुरात पूर्ण क्षमतेने नोंदणी सुरू झालेली नाही. सध्या हा ठेका सिल्व्हरटच, टेक्सामार्ट तसेच वकंगी, स्टॅटर्जिक या कंपनींना हा ठेका दिला आहे. तसेच ग्लोडाईल या कंपनीला राज्यातील २० महापालिकांचा ठेका मिळालेला आहे. तरी कोल्हापुरात ७७ प्रभागांमध्ये आधारकार्ड नोंदणी त्वरित सुरू करावी, प्रत्येक केंद्रावर १० किट (मशीन) उपलब्ध करून द्यावेत, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, अनेक ठिकाणी आधार कार्ड नोंदणीच्या फॉर्मची ५ ते १० रुपयांना विक्री सुरू आहे ती त्वरित थांबवावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आलेल्या आहेत. या वेळी दिलीप मैत्राणी, मधुमती पावनगडकर, गणेश देसाई, कवीत पाटील, पपेश भोसले, डॉ. शेलार, अशोक लोहार, यशवंत कांबळे, देवेंद्र जोंधळे, अमोल नागटिळे, सयाजी आवळेकर आदींसह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.