कांदा कमी खाल्ला तर काही फरक पडत नाही. परंतु, केंद्र सरकारने कांद्याचा जिवनावश्यक यादीत समावेश केला. इतकेच नव्हे तर, देशातील कांदा बाहेर जाऊ नये म्हणून निर्यातीवर बंदी आणत दुसरीकडे परदेशातून कांदा आयात केला. गोरगरीबांना अडचणीत आणणारी केंद्र सरकारची ही निती शेतकऱ्यांना उध्वस्त करणारी असल्याची तोफ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी डागली. राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सटाणा येथे शुक्रवारी झालेल्या सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामतीत केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना कृषीमंत्री असताना घेतलेल्या शेतकरी हिताच्या निर्णयांची सध्याच्या निर्णयांची तुलना केली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कांदा आणि तेल्या रोगामुळे अडचणीत आलेल्या डाळिंब उत्पादकांचा प्रश्न उपस्थित करत पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढविला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पवार यांच्या एकाच दिवशी सटाणा, दिंडोरी, चांदवड, मनमाड आणि सायंकाळी नाशिकरोड येथे अशा सलग पाच सभांचे आयोजन करण्यात आले. पहिली सभा सटाण्यात झाली. यावेळी त्यांनी कांदा व डाळिंब उत्पादकांना मागील केंद्र सरकारच्या काळातील विविध निर्णयांची आठवण करून दिली. कांदा हा जिरायत शेतकऱ्यांचा व्यवसाय आहे. त्याची किंमत वाढली की, त्यांना दोन पैसे अधिक मिळू शकतात. सध्या कांद्याच्या किंमतीत थोडीफार जरी वाढ झाली तरी लगेच निर्यात बंदी लादली जाते. पंतप्रधानांनी बारामतीच्या सभेत आपल्या मंत्रीपदाच्या कार्यकाळातील निर्णयांबद्दल बरेच आरोप केले. तथापि, आपल्या कार्यकाळात देशातील हजारो शेतकऱ्यांच्या डोक्यावरील ७० हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले. आवश्यकतेनुसार किमान निर्यात मूल्यात कधी बदल करून देशातील बाजारात कांद्याची किंमत वाढणार नाही पण शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल याची दक्षता घेतली. शेतकरी वर्गाला त्यांच्या घामाची किंमत मिळालायच हवी ही आमची भूमिका आहे. दोन वर्षांपूर्वी डाळिंबावर तेल्या रोग आल्यावर उत्पादकांना मोठय़ा प्रमाणात नुकसान भरपाई देण्यात आली. आज तेल्या रोगाने डाळिंबाची शेती उध्वस्त झाली असताना शेतकऱ्यांकडे कोणी ढुंकुनही पाहिले नाही, असे पवार यांनी सांगितले.
देशाच्या पंतप्रधानांवर संपूर्ण देशाची जबाबदारी असते. पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबारामुळे सीमावर्ती भागात हजारो नागरिकांना जीव मुठीत धरून स्थलांतरीत व्हावे लागले आहे. त्यांना खंदक वा इतरत्र आसरा घ्यावा लागला.
या स्थितीत देशाचे संरक्षण करण्यापेक्षा पंतप्रधानांना एकोमदार निवडून आणणे अधिक महत्वाचे वाटते, असा टोलाही पवार यांनी लगावला. महाराष्ट्राच्या व शेतकऱ्यांच्या हिताची जपवणूक करण्यासाठी राष्ट्रवादीला निवडून द्यावे, अ.से आवाहन त्यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

..भाजपमध्ये गेल्यावर संतमहात्मे ?
विधानसभेत राष्ट्रवादीच्या ज्या डॉ. विजयकुमार गावित व बबनराव पाचपुते या मंत्र्यांवर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले, विधानसभेत गोंधळ घालून काम बंद पाडले, त्यांना आता भाजपने पक्षात प्रवेश देऊन विधानसभेची उमेदवारी दिली आहे. संबंधितांवर आरोप झाले, तेव्हा राष्ट्रवादीने त्यांची मंत्रीपदे काढून घेतली. आज हे दोघे भाजपचे उमेदवार आहेत. म्हणजे आमच्याकडे असताना ते भ्रष्टाचारी आणि भाजपमध्ये गेल्यावर संतमहात्मे अशी या पक्षाची कार्यशैली असल्याची टिका शरद पवार यांनी केली.

जाहिरातीतून मराठीजनांचे चारित्र्यहनन
भाजपकडून सध्या कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा.. अशा जाहिराती केल्या जात आहेत. त्यात माफिया, गुंड व गुन्हेगारांचे हे राज्य असल्याचे दर्शविले जात आहे. वास्तवात तशी स्थिती नसताना भाजप राज्यातील शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य माणसाला उपरोक्त बिरुदे लावून हिणवत आहे. या जाहिरातींच्या माध्यमातून भाजपने मराठी माणसाला बेईज्जत करण्याचे काम केले असून विधानसभा निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन पवार यांनी केले.

मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp policy to destroy farmers says sharad pawar
First published on: 11-10-2014 at 03:00 IST