कळमनुरी शहरासह ग्रामीण भागातील ग्राहकांना गेल्या काही दिवसांपासून चढय़ा दराने केरोसीन खरेदी करावे लागते. सरकारी गोदामातून उचललेला रास्त भाव दुकानाचा माल लाभार्थीपर्यंत जाण्याऐवजी सरळ काळय़ा बाजारात जात आहे, असा आरोप मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोंद बांगर यांनी केला. रास्त भाव दुकानाच्या मालापासून गोरगरीब जनता वंचित राहात आहे. हे प्रकार तात्काळ बंद करण्यासाठी कारवाई करावी, अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदनात ११ किरकोळ केरोसीन विक्रेत्यांच्या नावांचा उल्लेख आहे. यापैकी काही दुकानदार शिधापत्रिकाधारकांना त्यांच्या हक्काचे केरोसीन देत नसल्याने त्यांची गैरसोय होते, याकडे निवेदनात लक्ष वेधले आहे. लाभार्थीच्या वाटय़ाचे केरोसीन सर्रास ५० रुपये लीटर दराने विकले जात असल्याची तक्रार आरोप बांगर यांनी केली. लाभार्थीना त्यांच्याच वॉर्डात रास्त भाव दुकानचा माल मिळावा, अशी व्यवस्था असताना प्रत्यक्ष स्थिती मात्र तशी नाही. अनेक दुकाने एकाच भागात असल्याची तक्रारही बांगर यांनी केली. या गैरप्रकाराची चौकशी करून रास्त भाव दुकानाचा माल लाभार्थीनाच मिळावा, यासाठी कारवाई करावी अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनात दिला आहे.
जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून दर महिन्याला ५ ते १० रास्त भाव दुकानदारांना विविध त्रुटी व कारणे दाखवा नोटिसा दिल्या जातात. मात्र, नोटीस दिल्यानंतर किती दुकानदारांवर खऱ्या अर्थाने कारवाई होते, हा भाग गुलदस्त्यातच आहे. काही दुकानदारांची अनामत रक्कम जप्तीच्या कारवाया होतात. पण ती अनामत रक्कम किती व त्याचा परिणाम दुकानदारांवर किती होतो, हा संशोधनाचा विषय आहे. गेल्या दोन वर्षांत किती रास्त भाव दुकानदारांना नोटिसा दिल्या. त्यात किती दोषी सापडले व त्यांच्यावर कोणती कारवाई केली. या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी केल्यास कारवाईचे सत्य बाहेर येईल, अशा प्रकारची चर्चा जिल्हाभर चालू आहे.