छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्याभिषेकाचे ठिकाण आणि मराठय़ांची राजधानी म्हणून ओळखला जाणारा रायगड कठीण किल्ला मानला जातो. इतिहासाबरोबरच या किल्ल्यास निसर्गसौंदर्याचेही कोंदण लाभले आहे. अलीकडेच अंध मुलांनाही रायगडचे सौंदर्य अनुभवता यावे यासाठी मुंबईच्या नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब) आणि जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने सहल आयोजित करण्यात आली होती. आठ ते पंधरा वयोगटातील ३० अंध विद्यार्थानी या दोनदिवसीय भटकंतीत भाग घेऊन रायगड पालथा घालून तेथील निसर्ग आणि रोमांचकारी इतिहासाचा अनुभव घेतला.
मुंबईतील वरळी येथील नॅब संस्थेच्या वतीने अंधांचे जीवन अधिक सुखकर आणि प्रगत करण्यासाठी प्रयत्न केले जातात. इतरांसारखे आनंदी आयुष्य अंध मुलांनाही मिळावे यासाठी संस्था विविध उपक्रमही राबविते. मुलांना इतिहास शिकवताना त्यांना किल्ले, तेथील भौगोलिक परिस्थती, तोफा, राजवाडे, महाद्वार, दरबार हे केवळ वर्णनांवरून सांगितले जात होते. मुलांना त्या सगळ्यांना स्पर्श करून त्यांचा आनंदही घेता आला पाहिजे ही या संस्थेची इच्छा होती. त्यामुळेच तीन वर्षांपूर्वी दुर्ग भ्रमंती क्षेत्रात कार्यरत असलेल्या चंद्रकांत साटम यांची भेट घेत अंध विद्यार्थाच्या दुर्ग भ्रमंतीची कल्पना त्यांनी साटम यांना सांगितली. मुंबई महापालिकेत उपअभियंता असलेले चंद्रकांत साटम जिजाऊ प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध गडदुर्गाच्या मोहिमा आखतात. त्यांनीही आनंदाने ही कल्पना उचलून धरत २०१० पासून अंध मुलांच्या दुर्ग भ्रमंतीच्या मोहिमा आखण्यास सुरुवात केली. २०१० मध्ये या संस्थांनी पहिली सिंहगड मोहीम यशस्वी केली. त्यानंतर २०११ मध्ये भाजाची लेणी आणि लोहगड या मोहिमा पूर्ण केल्या. या मोहिमांना विद्यार्थी, पालक आणि जिजाऊ प्रतिष्ठानच्या तरुणांनीही मोठा प्रतिसाद दिला. यंदा रायगडावर स्वारी आखण्यात आली. त्यासाठी नॅबच्या शाळेतील ३० मुले आणि प्रत्येकासोबत एक स्वयंसेवक अशी व्यवस्था करण्यात आली होती.
मुंबईतून शुक्रवार २३ ऑगस्ट रोजी या मुलांनी रायगडकडे प्रयाण केले. शनिवारी सकाळी ही मुले रायगडाच्या पायथ्याशी पाचाडमध्ये पोहचली आणि सकाळी या मुलांच्या रायगड चढण्याच्या मोहिमांना प्रारंभ झाला. तेथील निसर्ग, वनस्पती, फुलझाडे यांना स्पर्श करून त्यांची माहिती घेत, त्यांचे रंग समजून घेत हे विद्यार्थी आपल्यासोबतच्या स्वयंसेवकांसह गड सर करत होते. रायगडाचा चित दरवाजा, खुब लढा बुरुज, वाळू सऱ्याची खिंड, महादरवाजा, गंगासागर, हत्ती तलाव अशी विविध ठिकाणे पहिल्या दिवशी या विद्यार्थानी अनुभवली. एमटीडीसीच्या विश्रामगृहामध्ये या विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी या विद्यार्थानी मेणादरवाजा, राणीवसा, पालखी दरवाजा, धान्य कोठार, टाकसाळ, राजमहाल, अष्टप्रधान वाडे, राजदरबार, नगराखान, होळीचा माळ, बाजारपेठ, जगदिश्वराचे मंदिर आणि छत्रपतींच्या समाधी स्थानाला स्पर्श केला. यावेळी चंद्रकांत साटम छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील या ठिकाणी घडलेल्या घटनांची माहिती मुलांना देत होते त्यामुळे विद्यार्थी आणि स्वयंसेवकांसाठी ही मोहीम अविस्मरणीय अशीच होती. प्रथमेश दळवी नावाच्या मुलाला ही मोहीम इतकी आवडली की यानंतर या गटासोबत प्रतापगडही अनुभवायचा आहे, असे त्याने यावेळी जाहीरच करून टाकले, तर मनीष  रानातील पाना-फुलांच्या स्पर्शाने त्यांचे वर्णन सांगत होता. मुलांना किल्ला समजावा, यासाठी रायगडाची छोटी प्रतिकृतीही सोबत नेण्यात आली होती.