मीटर रिकॅलिबरेशन प्रक्रियेमध्ये व्यग्र असलेल्या आणि ती प्रक्रिया पार न पडल्याने एका रुपयाच्या किमान भाडेवाढीच्या फायद्याला मुकणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांना सदोष रिकॅलिबरेशनला सामोरे जावे लागत आहे. रिकॅलिबरेट झालेल्या मीटरमध्ये चाचणीदरम्यान दोष आढळल्यास रिक्षा चालकांना ती प्रक्रिया ७५ रुपयांचे जादा शुल्क भरून पुन्हा करावी लागते. ही कटकट टाळण्यासाठी आता मीटरला बोगस सील बसवून घेण्याचे प्रकारही सुरू झाले असून चाचणी केंद्राबाहेरच ५०-५० रुपयांत हे बोगस सील बसवून देणारी मुले फिरत आहेत. याबाबत रिक्षा संघटना आणि वैधमापनशास्त्र विभाग या उभय पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे.
रिक्षा-टॅक्सी मीटरच्या रिकॅलिबरेशनसाठी मीटरमध्ये असलेली चिप बदलावी लागते. ही चिप बदलल्यानंतर मीटरची ‘टेबल चाचणी’ आणि ‘रस्ते चाचणी’ अशा दोन चाचण्या घेतल्या जातात. या चाचण्यांदरम्यान ठरावीक अंतराआधीच मीटरमधील भाडय़ाची रक्कम वाढली किंवा मीटरमधील अंतर भराभर मोजले जात असेल, तर हे मीटर सदोष असल्याचे ठरवले जाते. संबंधित चालकाला मीटर दुरुस्त करून त्याची पुन्हा चाचणी घ्यावी लागते. त्यासाठी चाचणीसाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कात ५० टक्के सूट देऊन ७५ रुपये आकारले जातात. तसेच रिकॅलिबरेशन पूर्ण होऊन मीटरमध्ये वाढीव भाडय़ाचा आकडा दिसण्यासाठीही बराच काळ जातो.त्यामुळे मीटर दुरुस्त करून घेण्याऐवजी मीटरला थेट सील बसवण्याचा पर्याय रिक्षाचालकांना अधिक भुरळ घालतो आहे. रिकॅलिबरेशन केंद्रांऐवजी त्या केंद्रांबाहेरच चाचणी न घेता रिक्षांच्या मीटरना सील बसवून देणारी टोळी सध्या कार्यरत झाली आहे. या टोळीतील १२-१५ वर्षांची मुले रिक्षाला सील बसवून देत असल्याचे आढळले आहे. त्यासाठी ही मुले फक्त ५० रुपये रिक्षा चालकाकडून घेतात. हा प्रकार वैधमापनशास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने घडत आहे का, असा प्रश्न मुंबई ऑटोरिक्षामेन्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी विचारला आहे.
मीटरमध्ये फेरफार केल्याचे आढळल्यास आता रिक्षा चालकांना थेट तुरुंगवासाची शिक्षा आहे. त्यामुळे अशा बोगस सीलचा फटका रिक्षा चालकांनाच बसणार आहे. हा गैरप्रकार थांबवण्यासाठी वैधमानपशास्त्र विभाग कोणती कारवाई करणार, अशी विचारणाही राव यांनी केली आहे. यापैकी दोन मुलांना अंधेरी, विक्रोळी येथून ताब्यात घेतले होते. मात्र रिक्षा संघटनेला या प्रक्रियेवर नजर ठेवणे शक्य नाही. त्यामुळे आता पोलिसांनीच हस्तक्षेप करून ही प्रक्रिया सुरळीत पार पडेल, याकडे लक्ष द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान, याबाबत वैधमापनशास्त्र विभागाचे निमंत्रक संजय पांडे यांना विचारले असता सदोष मीटरमुळे चाचणीत अनुत्तीर्ण झालेले काही रिक्षाचालक अशा गैरमार्गाचा वापर करत असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली. मात्र ही सील बाहेरच्या लोकांना कशी उपलब्ध झाली, याबाबत तपास केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सील का लावतात ?
मीटरचे रिकॅलिबरेशन करताना सर्व प्रथम मीटरमधली चिप काढली जाते. यानंतर रिकॅलिबरेशन करुन पुन्हा चिप बसविली जाते. ही प्रक्रिया योग्यपद्धतीने झाली आहे की नाही हे तपासण्यासाठी मीटरची पुन्हा एक चाचणी होते व नंतर विभागातर्फे सील लावले जाते. पण जर तपासणीत काही त्रूटी आढळल्या तर टॅक्सी चालकाला पुन्हा सर्व प्रक्रिया पहिल्यापासून कराव्या लागतात. हा द्राविडी प्राणायाम वाचविण्यासाठी टॅक्सी किंवा रिक्षाचालक ५० रुपयांत सील लावून घेताना दिसतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bogus seal in re calibration
First published on: 09-07-2015 at 07:26 IST