पालघर जिल्ह्य़ातील वाडा तालुक्यात पिकवल्या जाणाऱ्या वाडा कोलमला सध्या राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशभरात मोठी मागणी आहे. जंगलांचा ऱ्हास, विकसित झालेल्या नवनवीत भात जाती तसेच उत्पादनासाठी येणारा मोठा खर्च येथील शेतकऱ्यांना परवडत नसल्याने वाडा कोलमचे उत्पादन निम्म्याहून कमी झाले आहे. मात्र तांदळाची विक्री करणाऱ्या दलालांकडून गुजरात, आंध्र प्रदेश या राज्यांतील व चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्य़ातील तांदळाला डबल पॉलिश लावून तो वाडा कोलमच्या नावाने मुंबईच्या बाजारपेठेत विकला जाऊ लागला आहे. हे व्यापारी एवढय़ावरच थांबलेले नाहीत तर हा बाहेरील तांदूळ वाडा तालुक्यातील भात भरडणी करणाऱ्या काही गिरणीमध्ये आणून येथे वाडा कोलमच्या नावाने छापलेल्या पिशव्यांमधून भरून पुन्हा मुंबई व अन्य शहरांमध्ये,मॉलमध्ये वाडा कोलम या नावाने विक्री केला जात आहे.
७५५.४९ चौरस किलोमीटरचे क्षेत्र असलेल्या वाडा तालुक्यात शेतीउपयोगी जमिनीचे क्षेत्र ३७ हजार १५६ हेक्टर इतके आहे. यामधील भातपिकाखालील क्षेत्र फक्त १८ हजार ३१२ हेक्टर इतकेच आहे. वाडा तालुक्याच्या सुदैवाने या तालुक्यातील २४ हजार ९०० हेक्टर क्षेत्र हे जंगलाने व्यापलेले आहे. या जंगलातून येणाऱ्या पाला-पाचोळ्याच्या नैसर्गिक खतावर काही वर्षांपूर्वी वाडा तालुक्यात झीनी, सुरती या वाडा कोलमचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन घेतले जात होते. जंगलातून आलेला पाला-पाचोळा व शेतकऱ्यांकडे मोठय़ा संख्येने असलेल्या गुरांपासून (जनावरे) मिळणारे शेणखत या नैसर्गिक खतापासून वाडा कोलम तयार व्हायचा. कुठल्याही प्रकारच्या रासायनिक खताची मात्रा नसलेल्या अशा या चवदार वाडा कोलमने मुंबई बाजारपेठेत शंभर वर्षांपूर्वीच आपले स्थान निर्माण केले आणि ते आजतागायत टिकवून ठेवले.
वाढत्या वृक्षतोडीमुळे जंगलांचा होणारा ऱ्हास, यांत्रिकी अवजारामुळे कमी झालेली जनावरांची संख्या, अधिक उत्पन्नाच्या हव्यासापोटी विकसित झालेल्या नवनवीन जातीच्या भातांची लागवड आणि त्यासाठी मोठय़ा प्रमाणात रासायनिक खतांचा वापर ही सर्व कारणे झीनी, सुरती या वाडा कोलमचे उत्पादन घटण्यामागे आहेत.
आज काही भात उत्पादकांनी झीनी, सुरती यांसारख्या दिसणाऱ्या भाताच्या जाती विकसित करून त्यापासून तयार केलेला तांदूळ वाडा कोलमच्या नावाने बाजारात आणला आहे. आंध्र प्रदेश, गुजरात तसेच महाराष्ट्रातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा जिल्ह्य़ांतून मोठय़ा प्रमाणात तांदूळ मुंबई मार्केटमध्ये येत आहे. या तांदळाची विक्री वाडा कोलमच्या नावाने केली जाते. विशेषत: मुंबई शहर, उपनगरे व आजूबाजूच्या ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार यांसारख्या शहरातील मॉल व मोठय़ा किराणा दुकानांतून वाडा कोलमच्या नावाखाली अन्य जातीच्या तांदळाची विक्री होत आहे.
मुंबईसारख्या जागतिक बाजारपेठेत वाडय़ाला ‘वाडा कोलम’मुळेच ओळखले जात आहे. आज इतर तालुक्यांतील, जिल्ह्यांतील शेतकरी आपला तांदूळ ‘वाडा कोलम’च्या नावाने विक्री करताना दिसून येत आहे. शासनाने कृषी खात्यामार्फत वाडा कोलमचे उत्पादन वाढवण्यासाठी विशेष संशोधन करण्याची नितांत आवश्यकता आहे. अन्यथा वाडय़ाच्या नावावर गडचिरोली, चंद्रपूरचा तांदूळ मुंबईकरांच्या माथी मारला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.