शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय व कलात्मक कारकिर्दीचा वेध घेणाऱ्या ‘युगप्रवर्तक’ या ग्रंथाचे येत्या रविवारी विलेपार्ले येथे प्रकाशन होत आहे. परचुरे प्रकाशन मंदिर, लोकमान्य सेवा संघ व हृदयेश आर्ट्स यांच्यातर्फे १० फेब्रुवारी या दिवशी संध्याकाळी सात वाजता विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघाच्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या ग्रंथात अनेक मान्यवरांनी बाळासाहेबांवर लिहिलेल्या लेखांचे संकलन करण्यात आले असून भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते हे प्रकाशन होईल. या वेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे, शिवसेना नेते सुभाष देसाई, ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत, ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी उपस्थित राहणार आहेत. या प्रकाशनानंतर सुधीर गाडगीळ या चौघांची मुलाखत घेणार आहेत. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांचा पद्मभूषण पुरस्कार घोषित झाल्याच्या निमित्ताने सुलोचनादीदी यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. कवी-संगीतकार यशवंत देव हे या वेळी पाडगावकर आणि त्यांच्यातील मैत्र उलगडणार आहेत. नीला रवींद्र या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतील.  हा कार्यक्रम सर्व साहित्यप्रेमींसाठी विनामूल्य आहे.