वेतनवाढीच्या रखडलेल्या कराराबाबत निर्णय घेण्यात यावा, या मागणीसाठी येथील बॉश कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरंभिलेले आमरण उपोषण सलग पाचव्या दिवशीही कायम राहिले.
संघटनेला पाठिंबा दर्शविण्यासाठी कामगारांनी सोमवारी कारखान्यातील अल्पोपहार व भोजनावर बहिष्कार टाकून प्रतिकात्मक निषेध नोंदविला. दरम्यान, उपोषण करणाऱ्या एका पदाधिकाऱ्याची प्रकृती खालावल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सातपूर औद्योगिक वसाहतीतील बॉश कंपनीत व्यवस्थापन आणि कर्मचारी संघटना यांच्यात वेतन वाढीच्या करारावरून दीड वर्षांपासून वाद सुरू आहे. जुना करार दीड वर्षांपूर्वी संपुष्टात येऊनही व्यवस्थापन नवा करार करण्यास पुढाकार घेत नसल्याची कर्मचारी संघटनेची तक्रार आहे. उत्पादन वाढ आणि वेतनात होणारी वाढ या मुद्यावरून व्यवस्थापन व कामगार संघटनेत मतभेद आहेत. नवा करार करताना व्यवस्थापनाने आठ टक्के उत्पादन वाढ मागितली आहे. कर्मचारी संघटना उत्पादन वाढीस तयार असली तरी अपेक्षित वेतनवाढीची मागणी केली जात आहे.
या शिवाय, तुटपुंज्या पगारावर दहा वर्षांपासून काम करणाऱ्या एक हजार प्रशिक्षणार्थीना कारखान्यात कायमस्वरुपी सामावून घ्यावे, यासाठी संघटना पाठपुरावा करत आहे. व्यवस्थापन तोडगा काढण्याची तयारी दर्शवित नसल्याने संघटना पदाधिकाऱ्यांनी कामगार आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरूवात केली. सोमवार हा या आंदोलनाचा पाचवा दिवस. परंतु, व्यवस्थापनाने कोणताही तडजोडीची तयारी दर्शविली नाही. या पाश्र्वभूमीवर, सोमवारी पहिल्या सत्रातील कामगारांनी कारखान्यातील दैनंदिन कामकाज सुरू ठेवत चहा, अल्पोपहार व भोजनावर बहिष्कार टाकला. या आंदोलनाचा कारखान्यातील दैनंदिन उत्पादनावर कोणताही परिणाम झाला नाही.
दरम्यान, उपोषण करणारे संघटनेचे पदाधिकारी संदीप दौंड यांची प्रकृती खालविल्यानंतर त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.