‘सत्यशोधक’ नाटकातील कलाकारांची भावना
‘‘सत्यशोधक’ नाटकात काम करायला लागलो त्या आधी नाटक कधीच पाहिले नव्हते. जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुल्यांचे जीवन उलगडत गेले, आणि अचानक वाटले, आपली पत्नी इतके सुंदर शिवणकाम करते, तिला आणखी प्रगती करण्यासाठी आपणच पाठिंबा द्यायला हवा! लगेच पत्नीसाठी शिवणयंत्र घेऊन आलो!’.. ‘नाटकात काम करण्यापूर्वीही मी माझ्या पत्नीला शिक्षण घेण्याचा आग्रह करायचो. नाटकात आल्यावर तिला शिक्षणाची गरज पटली!’..‘घरातली कर्ती स्त्री असूनही चूल आणि मूल याशिवाय काही माहिती नव्हते. शिक्षण नसल्यामुळे न कळलेले फुले नाटकाच्या निमित्ताने समजले!’..
‘कालचि होते मुके आज बोलु लागले’ या उक्तीची आठवण करून देणाऱ्या या भावना व्यक्त केल्या ‘सत्यशोधक’ या नाटकात काम करणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या कामगार युनियनमधील कलाकारांनी!
‘सत्यशोधक’ या नाटकाच्या शंभराव्या प्रयोगाच्या निमित्ताने याच विषयावरील ‘साप्ताहिक साधना’ विशेषांकाचे प्रकाशन मंगळवारी अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचे सुनील देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. ज्येष्ठ नाटककार गो. पु. देशपांडे, नाटय़दिग्दर्शक अतुल पेठे, कामगार नेत्या मुक्ता मनोहर, ‘साधना’चे संपादक नरेंद्र दाभोलकर, कार्यकारी संपादक विनोद शिरसाठ या वेळी उपस्थित होते. संध्या टांकसाळे यांनी या वेळी नाटकातील कलाकार व इतर संबंधितांशी संवाद साधला.
मुक्ता मनोहर म्हणाल्या, ‘‘नवीन आर्थिक धोरणांमध्ये चळवळी गोत्यात आल्यानंतर युनियनने नाटके करणे लोप पावले होते. विजय तेंडुलकरांनंतरची नाटय़क्षेत्रातील पोकळी या नाटकाने भरून काढली. चळवळीतील बांधिलकीचा आजच्या काळात अभाव जाणवतो. विशेषत: मध्यमवर्गीय तरूण मुलांमध्ये ही बांधिलकी दिसत नाही. ती या नाटकाच्या निमित्ताने दिसली.’’
अतुल पेठे म्हणाले,‘‘माझ्या मर्यादित अनुभवक्षेत्रातून बाहेर पडण्यासाठी हे नाटक एक माध्यम ठरले. चळवळीतील कामगारांचे वर्तमानाशी जे थेट नाते असते त्यातून आलेल्या वैचारिक प्रगल्भतेने या नाटकाला पाठबळ दिले. कला जेव्हा समाजात विसर्जित होते तेव्हा ती अधिक समृद्ध होते.’’
सावित्रीबाईंच्या भूमिकेने मनाच्या घुसमटीकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन दिल्याचे अभिनेत्री पर्ण पेठे हिने सांगितले.