मराठी कथालेखन आणि भाषा व साहित्यावर आपली स्वतंत्र नाममुद्रा उमटविणारे ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या लेखणीची जादू आणि खास मधु मंगेश शैलीतील ‘शाली’न संवाद लवकरच पुन्हा एकदा त्यांच्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहेत. ‘कनक एन्टरटेन्मेंट’ची निर्मिती असलेल्या आगामी ‘शाली’ या चित्रपटाचे संवाद लेखन मधु मंगेश कर्णिक यांचे आहे.
मराठी साहित्यात मधु मंगेश हे अजातशत्रू म्हणून ओळखले जातात. ते ‘कोकण मराठी साहित्य परिषदे’चे संस्थापक अध्यक्ष असून मालगुंड येथील कवी केशवसुत यांच्या स्मारकाची उभारणी त्यांच्याच पुढाकाराने झाली आहे. प्रसन्न व्यक्तिमत्त्व आणि गोष्टीवेल्हाळ स्वभाव यामुळे ते समोरच्याला सहज आपलेसे करून टाकतात. कथा, कादंबरी, ललित लेखन, दूरदर्शन मालिकांसाठी लेखन, बालकथालेखन, व्यक्तिचित्रे आदी विविध प्रकारचे लेखन त्यांनी आजवर केले आहे. ते म्हणतात, ‘मला जन्मजात लाभलेली सर्जनात्मकऊर्जामी गेली साठ वर्षे साहित्यात वापरली. समाजाकडून ऊर्जा घेणे आणि ती शब्दांतून परत करणे हाच माझा प्रयत्न असतो’.‘भाकरी व फूल’, ‘जुईली’, ‘रानमाणूस’ आणि ‘सांगाती’ या दूरदर्शन मालिकांसाठी तर ‘पतीतपावन’ आणि ‘निर्माल्य’ या चित्रपटांसाठी संवाद व गीतलेखन त्यांनी केले आहे. आता ‘शाली’ या चित्रपटाच्या निमित्ताने ते पुन्हा एकदा चित्रपट संवाद लेखनाकडे वळले आहेत. जयसिंग साटम निर्मित आणि अतुल साटम दिग्दर्शित ‘शाली’ या चित्रपटाच्या एका गाण्याचे ध्वनिमुद्रण तसेच चित्रपटाच्या संहितेचे पूजन नुकतेच मधु मंगेश कर्णिक तसेच चित्रपटाशी संबंधित मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतेच पार पडले. दिवंगत साहित्यिक-कथाकार शंकर पाटील यांच्या ‘शारी’ या कथेपासून प्रेरणा घेऊन अतुल साटम यांनी लिहिलेल्या चित्रपट कथा व पटकथेवर मधु मंगेश यांनी संवाद लेखन केले आहे.
चित्रपटात कोकणातील निसर्गाचे आणि माणसांच्या स्वभावाचे दर्शन घडणार आहे. चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण हे कोकणात होणार असल्याने कोकणातील सण, उत्सव, चालीरिती याचा समावेश चित्रपटात आहे. चित्रपटातीत गाणी गुरु ठाकूर यांची असून ती कोकणातील दशावतार, भारुड, भजन व अन्य परंपरा यांना स्पर्श करणारी आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chat with madhu mangesh karnik
First published on: 21-10-2014 at 06:04 IST