बँक ऑफ इंडियाच्या शिरपूर शाखेतून काही जणांनी खोटी कागदपत्रे सादर करून सुमारे २० लाख रुपये कर्ज स्वरूपात काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यापूर्वीही २१ लाख   रुपयांचे   कर्ज  अशाच प्रकारे काढण्यात आले होते. सात-बारा उताऱ्यासह खोटी कागदपत्रे सादर करून शिरपूर येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून तब्बल सात लाख ९८ हजार रुपयांचे कर्ज काढल्याच्या आरोपाखाली थाळनेरच्या जमादारवाडा येथील आत्माराम कोळी (३६) व प्रवीणसिंग राजपूत (३६) यांच्याविरुद्ध फसवणूक व विश्वासघात केल्याचा गुन्हा शिरपूर पोलिसांनी दाखल केला आहे. बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक मनोज खैरनार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वेगवेगळे गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहेत. दुसऱ्या गुन्ह्य़ात जमादारवाडय़ातीलच कुबेरसिंग राजपूत व रवींद्र गुरव यांनी पाच लाख ५६ हजार रुपयांचे कर्ज काढले तर तिसऱ्या गुन्ह्य़ात प्रवीणसिंग राजपूत व कुबेरसिंग राजपूत यांनी सहा लाख रुपयांचे कर्ज काढले. तिन्ही गुन्ह्य़ांची पद्धत एकच आहे.
अल्पवयीन मुलीस पळविल्याचा गुन्हा
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या आरोपाखाली शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथील भटू माळी, हिराबाई माळी यांच्याविरुद्ध नरडाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बेटावद गावात ही घटना घडली.
छेडछाडला कंटाळून आत्महत्या
सतत होणाऱ्या छेडछाडला कंटाळून साक्री येथे नाजो ऊर्फ नाजबीन इकबाल तांबोळी (१६) हिने   गळफास    घेतला.    या    प्रकरणी    अलीम    शफिक खाटिक  विरुद्ध साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मूल होत नसल्याने छळ; विवाहितेची आत्महत्या
मूल होत नाही म्हणून पतीकडून सतत होणाऱ्या छळाला कंटाळून   शिरपूर तालुक्यातील जोयदा येथील कविता प्रवीण पवार (२७) यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.