गणेशोत्सवात चायनीज दरवळ

‘चायना’ मेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंनी भारतीय बाजारपेठेत धुमाकूळ घातलेला असतानाच आता अगरबत्तीच्या व्यवसायावरही चीनचे अतिक्रमण झाले आहे. अगरबत्ती तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल सध्या मोठय़ा प्रमाणात चीन आणि व्हिएतनाममधून आयात केला जात आहे.

‘चायना’ मेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंनी भारतीय बाजारपेठेत धुमाकूळ घातलेला असतानाच आता अगरबत्तीच्या व्यवसायावरही चीनचे अतिक्रमण झाले आहे. अगरबत्ती तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल सध्या मोठय़ा प्रमाणात चीन आणि व्हिएतनाममधून आयात केला जात आहे. या देशातून कच्च्या मालाच्या स्वरूपात आणलेल्या उदबत्यांवर ‘सुगंध’देण्याची प्रक्रिया करून त्या येथे वेगवेगळ्या नावाने विकल्या जात आहेत. भारतीय अर्थव्यवस्था तगली तर गणपतीसह सर्व देवदेवतांनाही चांगले दिवस येतील. पण ही जाण ‘अजाण’ भक्तांना नाही. त्यामुळेच भारतीय उदबत्त्या महाग पडतात या सबबीखाली ‘आर्थिक शत्रू’ असलेल्या चीनमध्ये तयार झालेल्या स्वस्त उदबत्त्यांना मोठी मागणी आहे.
भारतात बंगळुरू, म्हैसूर, कोलकाता, बिहार, तामिळनाडू आदी ठिकाणे उदबत्त्यांसाठी प्रसिद्ध आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून अगरबत्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालाच्या किंमतीत झालेल्या भरमसाठ वाढीमुळे हा कच्चा माल चीन आणि व्हिएतनाम येथून आयात करण्यास अधिक भर दिला जात आहे.
अगरबत्ती तयार करण्यासाठी प्रामुख्याने बांबूच्या काडय़ा, कोळशाची पूड, जिलेट आदी कच्चा माल लागतो. सध्या चीन आणि व्हिएतनाम येथून हा कच्चा माल मोठय़ा प्रमाणात भारतात आयात होत आहे. तेथून आणलेल्या या उदबत्त्यांना वेगवेगळ्या सुवासिक द्रव्यांमध्ये बुडवून ठेवून स्थानिक नावाने विकण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. अगरबत्ती तयार करण्यासाठी कामगारांची आवश्यकता असते. मात्र हल्ली यंत्रावर हे काम केले जात असल्याने या कामगारांचाही गरज राहिलेली नाही. एक यंत्र दहा कामगारांचे काम करते, त्याचाही परिणाम या व्यवसायावर झाला आहे.
चीन आणि व्हिएतनाममधून येणाऱ्या अगरबत्त्या या रंगीबेरंगी असतात. लोकांनाही त्याचे आकर्षण निर्माण झाले आहे. एकेकाळी भारतअगरबत्तीचे माहेरघर मानला जात असे, मात्र आता तशी परिस्थिती राहिली नसल्याचे ‘महाराजा अगरबत्ती’चे अरविंद शाह यांनी सांगितले.

भारतातील अगरबत्तीचा व्यवसाय चीन आणि व्हिएतनाम यांनी ‘हायजॅक’ केला आहे. अगरबत्ती तयार करण्यासाठीचा कच्चा माल हा मोठय़ा प्रमाणात या देशातून भारतात येत आहे. भारतात दरमहा सुमारे १५ ते २० कंटेनर अगरबत्तीचा कचाच माल येत आहे.
सिद्धार्थ बायकेरी
अध्यक्ष-महाराष्ट्र अगरबत्ती मॅन्युफॅक्चर्स
अ‍ॅण्ड डिलर्स असोसिएशन

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: China made agarbatti in indian market