जागतिक आर्थिक मंदीचे ढग भारतीय बाजारपेठेवर अधिकाधिक गडद झाल्याने रियल इस्टेट उद्योगाला पुरती उतरती कळा लागलेली आहे. असे असताना सिडकोने नुकत्याच विक्रीस काढलेल्या तीन भूखंडांना कोटय़वधीचे भाव मिळाल्याने रियल इस्टेट जगतात आश्र्चय व्यक्त केले जात आहे. या तीन भूखंडांच्या विक्रीतूनच सिडकोच्या तिजोरीत ४३९ कोटी रुपये जमा झाले आहेत. यापूर्वीही सिडकोने नेरुळ, बेलापूर येथे विक्रीस काढलेल्या भूखंडांना सोन्याचा भाव प्राप्त झाला होता. त्यामुळे सिडको वर्तुळात आनंद साजरा केला जात आहे.

सिडकोने नुकतीच खारघर, सेक्टर २३ येथे तीन भूखंडांची विक्री जाहिरात काढली होती. निवासी अधिक वाणिज्य प्रकारातील या भूखंडांना किती भाव येईल याकडे सिडकोच्या पणन विभागाचे लक्ष लागून राहिले होते. जागतिक आर्थिक मंदीचे ढग गेले अनेक दिवस भारतीय बाजारपेठांवर गडद झालेले आहेत. त्यामुळे अनेक उद्योग गाशा गुंडाळण्याच्या बेतात असून रियल इस्टेट उद्योग तर पूर्णपणे ठप्प झाला असल्याचे चित्र आहे. विकासकांच्या इमारती बांधून विक्रीअभावी पडून आहेत, तर काही विकासकांनी अनेक योजना जाहीर करूनही घर खरेदी करण्यास ग्राहक धजावत नाही. त्यात ग्रीस आणि चीन येथील आर्थिक स्थिती ढासळू लागल्याने भारतीय उद्योगधंद्यावर त्याचे परिणाम अधिक जाणवू लागले आहेत. या सर्व पाश्र्वभूमीवर सिडकोच्या भूखंडांना येणारी किंमत ही आश्र्ययजनक असल्याचे मानले जाते. सिडकोकडे आता विक्रीला जमीन कमी आहे. त्यामुळे पुरवठा कमी झाल्याने दर वाढले असल्याचे गणित मांडले जात आहे. त्यामुळे खारघर, सेक्टर २३ येथे विक्रीस काढण्यात आलेल्या तीन भूखंडांना अनुक्रमे एक लाख ६१ हजार १११, एक लाख ७१ हजार ५११ व एक लाख ८४ हजार १११ असे  तीन वेगवेगळे दर भूखंडांना आलेले आहेत. या तीनही भूखंडांच्या विक्रीतून सिडकोला तब्बल ४३९ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. काही दिवसांपूर्वी सिडकोचा दैनंदिन खर्च चालविण्यासाठी सिडकोला मुदतपूर्ण झालेली ठेव काही दिवस वापरावी लागली होती. त्यामुळे येत्या काळात मिळणाऱ्या या कोटय़वधी रुपयांमुळे सिडकोचे काही दिवस ठेवी हाती न ठेवता भागणार आहेत. मागील महिन्यात नेरुळ, सेक्टर १३ येथे अशाच प्रकारे विक्रीस काढण्यात आलेल्या पाच भूखंडांना दोन लाख ११ हजार ९९९, दोन लाख दोन हजार २२९, दोन लाख २१ हजार २३४, दोन लाख ३१ हजार ६६६ आणि दोन लाख ८२ हजार ३३३ प्रति चौरस मीटर असे दर प्राप्त झाले होते, तर बेलापूर येथील भूखंडाला एक लाख ८५ हजार रुपये दर मिळाला होता. हे भूखंड दीड हजार ते तीन हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचे होते. त्यामुळे सिडकोच्या भूखंडांना आजही ‘किंमत’ असल्याची चर्चा सिडको वर्तुळात सुरू होती. विमानतळ, मेट्रो, उरण रेल्वे, वडाळा-न्हावा शेवा सी लिंक, नयना क्षेत्र विकास यामुळे नवी मुंबईत पडेल त्या किंमतीत जमीन विकत घेऊन ठेवणे काही विकासकांना योग्य वाटत आहे.