पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार २१ जून रोजी जागतिक स्तरावर साजऱ्या केल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सिडको महामंडळाच्या वतीने नवी मुंबईतील सिडको प्रदर्शन केंद्रात योग शिबिराचे रविवारी आयोजन करण्यात आले आहे.
या योग शिबिराच्या उपक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी नवी मुंबईतील विविध वयोगटातील तसेच सर्व स्तरावरील नागरिकांनी या पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात मोठय़ा प्रमाणावर सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. सध्याच्या संगणक युगातील धावपळ आणि धकाधकीची जीवनप्रणाली यामुळे निर्माण हेात असलेल्या ताण-तणावावर योग साधना किंवा ध्यानधारणा अंत्यत उपयुक्त आहे. त्यांचा प्रचार आणि प्रसार व्हावा हाच योगदिनाच्या आयोजनाचा उद्देश आहे.
सकाळी ६.३० ते ७ वाजेपर्यंत पहिल्या योगसत्राच्या बैठकीची पूर्वतयारी होईल. पहिले सत्र ७ ते ८ या वेळेत होणार आहे.
त्यांनतर दुसऱ्या सत्रात १०८ सूर्यनमस्कारांचे प्रात्यक्षिक सादर केले जाईल. हे सत्र सकाळी ९ वाजेपर्यंत चालणार आहे. त्यांनतर पुढच्या १ तासात सहज मार्ग या ध्यानधारणा पद्धतीचे प्रात्यक्षिक सादर केले जाणार आहे. सकाळी १० ते ११ या वेळेत नवी मुंबईतील पोलीस दलाकरिता दिव्य पतंजली योगपीठाच्या वतीने विशेष योग सत्राचे आयोजनही करण्यात येणार आहे. दुपारी १२ ते १ या काळात विविध ध्यानधारणा पद्धतीची प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात येईल. तसेच या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या मान्यवर संस्थांना त्यांची प्रकाशने, उत्पादने प्रदर्शित करण्यासाठी व नागरिकांना माहितीचे आदानप्रदान करण्याकरिता सिडकोच्या वतीने प्रदर्शन स्टॉलची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.