पनवेल तालुक्यात विविध महाविद्यालयांमध्ये लागलेल्या स्पर्धेमुळे शिक्षणासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मात्र हे वातावरण विद्यार्थ्यांसाठी नव्हे तर शिक्षणचालकांसाठी पोषक ठरत आहे. शिक्षणाच्या या पवित्र गंगेचे अमृत विकून स्वत:चे खिसे भरणारे शिक्षणसम्राटही या ठिकाणी अनेक आहेत. दहावीतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकडून अकरावी प्रवेशासाठी डोनेशन या शब्दाला बगल देत महाविद्यालयाच्या विकासनिधीसाठी तीस हजार ते ६० हजार रुपये भरून दाखला घेण्याची वेळ आली आहे.
गुरुवारी अकरावी प्रवेशाची तिसरी यादी प्रसिद्ध झाली. यात केवळ १२४८ विद्यार्थ्यांना पनवेलच्या विविध महाविद्यालयात प्रवेश मिळाल्याचे निश्चित झाले. एकूण तीन हजार ३४९ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेशासाठी नोंदणी केली होती. या प्रक्रियेतून शास्त्र विभागात एक हजार ३६ विद्यार्थी, वाणिज्य शाखेतील ९२२ विद्यार्थी आणि कला शाखेतील १४३ विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले. पनवेलमध्ये एकूण दहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावी इयत्तेत यश संपादन केले होते. परंतु उर्वरित विद्यार्थ्यांनी विविध महाविद्यालयांचा व्यवस्थापन कोटा, अल्पसंख्याक महाविद्यालयीन कोटय़ातून प्रवेश मिळविण्यासाठी फिल्डिंग लावली आहे.
महाविद्यालय व्यवस्थापन कोटय़ातून होणाऱ्या प्रवेशाच्या विरोधात सरकारचा कोणताही विभाग ठोस कारवाई करत नसल्याने पालकही हवालदिल झाले आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकलेल्या विद्यार्थ्यांनाही त्याच महाविद्यालयात अकरावी प्रवेशासाठी गुण कमी मिळाल्यास ५० ते ६० हजार रुपये भरूनच प्रवेश मिळत आहे. याबाबत पनवेलच्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती मीना यादव म्हणाल्या की, पनवेलमध्ये विद्यार्थ्यांकडून डोनेशन उकळणाऱ्या शिक्षण संस्थेविरोधात पालकांनी तक्रार केल्यावर त्यावर कायदेशीर कारवाई होईल. पालकांच्या वाढीव शुल्काच्या तक्रारीमधील तथ्य तपासण्यात येईल. शिक्षण उपसंचालकांनी मार्गदर्शित केलेल्या महाविद्यालयीन शुल्काची नियमबाह्य़ आकारणी झाल्याचे आढळल्यास संबंधित शिक्षण संस्थेविरोधात तसा अहवाल पाठविला जाईल. या अहवालावर शिक्षण संस्था दोषी आढळल्यावर अशा शिक्षण संस्थांची मान्यताही वेळीच रद्द करण्यात येऊ शकते, असे त्यांनी सांगितले.