जामीन मंजूर करताना न्यायालयाने दिलेल्या अटींचा भंग करत असल्यामुळे आरोपींचा जामीन रद्द करावा अशी फिर्याद पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शरद क्यादर यांनी कोतवाली पोलीसांकडे केली. समाजातीलच दुसऱ्या एका गटाने आमदार अनिल राठोड यांच्या मदतीने संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचे हे प्रकरण आहे.
क्यादर यांच्याच फिर्यादीवरून १ डिसेंबर २०१२ ला आमदार राठोड तसेच अन्य १५ यांच्याविरूद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाची गांधी मैदान येथील शाळा तोडफोड करून ताब्यात घेण्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. राठोड वगळता अन्य १५ आरोपींना न्यायालयात अटी व शर्तीवर जामीन मंजूर झाला आहे. कोतवाली पोलीस दोषारोप पत्र दाखल करेपर्यंत मंडळाच्या जागेत कोणत्याही कारणासाठी जाऊ नये ही प्रमुख अट त्यात होती.
या १५ आरोपींपैकी एकाला पोलीसांनी अद्याप अटक किंवा कोणताही कारवाई केलेली नाही. जामीन मिळालेल्या १५ आरोपींपैकी अंबादास चिटय़ाल, ज्ञानेश्वर मंगलारम, मल्लेशाम इगे, कुमार आडेप, शिवराम श्रीगादी, दत्तात्रय रासकोंडा, राधाकिसन म्याना, प्रकाश येनंगूदल यांनी न्यायालयाच्या अटीचा वारंवार भंग करून मंडळाच्या शाळेत एकत्र येणे, शिक्षकांनी दमदाटी करणे असे प्रकार सुरू केले आहे. त्याचा शाळेतील विद्यार्थी, शिक्षक यांच्यावर वाईट परिणाम होत आहे. त्यामुळे त्यांचा जामीन रद्द व्हावा यासाठीची कायदेशीर प्रक्रिया सुरू करावी अशी फिर्याद क्यादर यांनी कोतवाली पोलीसांकडे दाखल केली आहे.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Complaint to rejection of bail
First published on: 11-04-2013 at 01:08 IST