आगामी लोकसभा निवडणूक बघता संघटनात्मक बांधणी करण्याच्या दृष्टीने पक्ष पातळीवर प्रयत्न सुरू असताना गेल्या काही दिवसांपासून शहर राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन गट एकमेकांविरोधात उभे ठाकले असून शहर अध्यक्ष अजय पाटील यांच्या विरोधातील मोहीम पक्षातील विरोधकांनी अधिक तीव्र करून पक्षश्रेष्ठीकडे तक्रार करून राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे.  
महापालिका निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेले अल्प यश आणि त्यानंतर संघटनात्मक दृष्टया पक्ष पातळीवर कुठलेच प्रयत्न होताना दिसत नसल्यामुळे अनिल अहिरकर आणि दिलीप पनकुले शब्बीर अहमद विद्रोही, दुनेश्वर पेठे, बजरंगसिद परिहार, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विशाल खांडेकर, महिला अध्यक्ष नुतन रेवतकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी पाटील यांच्या विरोधातील मोहीम अधिक तीव्र केली असून पाटील यांनी शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करीत पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी याची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना काम न करू न देणे, कार्यकर्त्यांना विश्वासात न घेणे, भाजपच्या पधधिकाऱ्यासोबत फिरणे या सर्व बाबींमुळे पक्षाचे काम कमकुवत झाले आहे. महापालिकेत भाजपाची सत्ता असताना आणि राष्ट्रवादी विरोधी पक्ष असताना राजू नागुलवार भाजपाच्या मदतीने सभापती झाले आणि त्याला पाटील यांनी पाठिंबा दिला आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष रमेश बंग यांच्या उपस्थित पाटील यांच्या विरोधात बैठक झाली होती. त्यावेळी अजय पाटील यांना जाब विचारण्यात येऊन त्यांना ताकीद देण्यात आली होती. मधल्या काळात विरोधी गटातील कार्यकर्त्यांना शांत करण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा पाटील हटाव मोहीम तीव्र करण्यात आली आहे. अनिल अहिरकर यांनी सांगितले, आगामी लोकसभा निवडणुका बघता पाटील यांच्या कार्यकाळात शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटनात्मक दृष्टय़ा काहीच काम वाढत नसल्यामुळे पाटील यांची हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी पक्षश्रेष्ठीकडे केली आहे. पक्षाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना पाटील विश्वासात घेत नाहीत, असा आरोप अहिरकर यांनी केला. अनिल देशमुख यांच्याकडे या संदर्भात पाटील विरोधातील कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन देण्यात आले आहे असून लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे अहिरकर यांनी सांगितले.
अजय पाटील यांचा प्रतिहल्ला
जे लोक मला हटविण्याची मागणी करीत आहे ते पक्षामध्ये सक्रिय तरी आहेत का? असा प्रश्न उपस्थित करून पाटील यांनी पक्षश्रेष्ठी आदेश देतील तरच राजीनामा देणार असल्याचे ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. पक्ष पातळीवर संघटनात्मक दृष्टया प्रभाग आणि वॉर्डात आणि बुथ पातळीवर कार्यकर्त्यांना जोडले जात असून विविध पक्षाचे कार्यकर्ते राष्ट्रवादी प्रवेश करीत आहे. ज्या लोकांना केवळ पदावर राहून समोर समोर करायचे असेच कार्यकर्ते पदाधिकारी आणि कार्यकर्ते विरोध करीत आहे मात्र त्याला विरोधाला फारसे महत्त्व देत नाही. पक्ष श्रेष्ठीशी कडून काही आदेश आल्यास त्यांच्याशी चर्चा करायला जाईल, असेही पाटील यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Conflicts between city ncp leaders came in front
First published on: 22-05-2013 at 09:58 IST