राज्य सरकारच्या वतीने पालिका क्षेत्रांसाठी लागू करण्यात आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी)विरोधात व्यापारी एकटवला असल्याने आता एलबीटीच्या समर्थनार्थ काँग्रेस कार्यकर्ते पुढे सरसावाले असून हा कर कसा योग्य आहे, त्याचे प्रबोधन करण्यास सुरुवात केली आहे. नवी मुंबईत आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने येथील कार्यकर्त्यांनी या कामी पुढाकार घेतला असल्याचे दिसून येत आहे.
नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष दशरथ भगत यांनी वाशी येथे नुकतीच एक सभा घेऊन आपल्या सर्व नगरसेवकांना तसेच कार्यकर्त्यांना एलबीटीच्या वस्तुस्थिती जनतेपर्यंत घेऊन जाण्याचे आवाहन केले आहे. हा कर लावण्यात यावा, अशी मागणी व्यापाऱ्यांनीच चार वर्षांपूर्वी केली होती, अशी आठवण भगत यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात करून दिली आहे.
एलबीटीमधून ५९ जीवनावश्यक वस्तूंना वगळण्यात आल्याने या कराचा सर्वसामान्यांना आर्थिक भरुदड पडत नसून एलबीटीच्या नावाने काही व्यापारी ग्राहकांची फसवणूक करीत असल्याची बाबही भगत यांनी स्पष्ट केली आहे. एलबीटीचा जास्त प्रभाव नवी मुंबईतील घाऊक व्यापाऱ्यांना होत असल्याने त्यांनी दोन बाजारपेठा बंद ठेवल्या आहेत. व्यापाऱ्यांनी ग्राहकांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता बाजारपेठा सुरू कराव्यात, असे आवाहनही काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे. एलबीटीवरून काँग्रेसला बदनाम करण्याचे तंत्र काही राजकीय पक्षांनी सुरू केल्याने त्यास जशास तसे उत्तर देण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आल्याचे भगत यांनी सांगितले.
एलबीटीसंदर्भात अनेक समज-गैरसमज असल्याने ग्राहकांचे प्रबोधन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. एलबीटीच्या नावाखाली काही किरकोळ विक्रेत्यांनी जीवनावश्क वस्तूच्या किमतीत वाढ केली आहे. ते जनतेसमोर मांडण्याची मोहीम काँग्रेस कार्यकर्त्यांनी हाती घेतली आहे. एलबीटीमुळे पालिकांच्या नागरी सुविधांमध्ये सुधारणा होणार असून जनतेला त्याचा फायदा होणार असल्याने व्यापाऱ्यांनी ग्राहकांना आता अधिक त्रास देऊ नये, अशी विनंती भगत यांनी सर्व व्यापारी संघटनांना पत्र पाठवून केली आहे.