महाबळेश्वर पाचगणी वाईच्या पश्चिम भागात पाऊस सुरू असल्याने धोम धरणातून कृष्णा नदीच्या पात्रात ६४०० क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे,तर बलकवडीतून धोम धरणात १७०० क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे.
महाबळेश्वर येथे आज ११३ मिमी (४४८७.६) पाचगणी ३९.४ मिमी पावसाची नोंद झाली. धोम व बलकवडी धरणांच्या पर्जन्यक्षेत्रात अचानक वाढलेल्या पावसाने धोम धरणात पाण्याची आवक वाढल्याने पाणी नदीपात्रात सोडावे लागले. सध्या ६४०० क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे वाईला नदीपात्रातील पाणी पाहण्यास आजूबाजूच्या परिसरातून गर्दी झाली होती.
फलटण, खंडाळासाठी पाणी सोडणार
खंडाळा व फलटण या दुष्काळी भागात पावसाचे प्रमाण नगण्य राहिल्याने या भागातील पाणी पातळी, तलाव, विहिरी, ओढे वाहण्यासाठी धोम धरणातून कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येणार आहे, सध्या कालव्याच्या दुरुस्तीची कामे सुरू होती. ही कामे लवकरच मार्गी लागत असून या भागात कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येणार आहे.
धोम धरणाच्या हौदातून मासे पळविले
धोम धरण परिसरात दोन दिवसांपूर्वी पाऊस कमी झाल्याने धरणाचे पाचही दरवाजे बंद केले होते. यावेळी दरवाज्या समोरील हौदात मासे पकडण्यासाठी अनेक भागातून तरुण लोक आले होते. काहींनी तर जाळ्या टाकून मासे पकडले. खोचिर, दांडकी आणि टोकदार हत्यारे घेऊन मासे पकडले. धरणाजवळील लोकांनी मासे विकून मोठी कमाई केली. हे मासे तीन ते सात आठ किलोपर्यंत होते. या धरणात सिव्हर काटला जातीचे मासे मोठय़ा प्रमाणात आहेत. काही वेळ पाणी बंद झाल्याचा फायदा फार मोठय़ा प्रमाणात उचलला गेला. किमान सात-आठ टन मासेमारी झाली. मासेमारांच्या गर्दीला आवर घालण्यास धरणाच्या सुरक्षा यंत्रणेलाही अपयश आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onवाईWai
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Continuous rain in mahabaleshwar and wai
First published on: 30-07-2013 at 01:50 IST