फेब्रुवारीमध्ये संपावर जाण्याचा इशारा
नगरपालिका कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतनाचा संपूर्ण फरक व्याजासह रोखीने व एकरकमी मिळावा यासाठी नंदुरबार जिल्हा नगरपरिषद कर्मचारी युनियनने २० फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाण्याची नोटीस नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांना दिली आहे.
शहादा पालिका कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतनाचा फरक अजूनही मिळालेला नाही. या संदर्भात युनियनचे अध्यक्ष विलास मराठे यांनी नऊ जानेवारी २०१३ रोजी पत्र दिले होते. या पत्रात युनियनने चर्चा करण्याची मागणी केली होती. परंतु पालिका पदाधिकाऱ्यांनी या पत्राची दखल न घेता साधी चर्चाही केली नाही. या मुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. सहाव्या वेतनाची रक्कम रोख व फरक एकरकमी न दिल्यास २० फेब्रुवारीपासून सर्व पालिका कर्मचारी बेमुदत संपावर जातील अशी नोटीस बुधवारी देण्यात आल्यावर नगराध्यक्षा संगीता पाटील व मुख्याधिकारी डॉ. पंकज पवार यांनी युनियनचे विलास मराठे, डॉ. कांतीलाल टाटिया, दीपक भामरे आदींशी चर्चा केली.
पालिका प्रशासन सकारात्मक भूमिका घेत असून सर्वाना लवकरच न्याय देण्यात येईल, असे आश्वासन मुख्याधिकारी डॉ. पंकज पवार यांनी दिले तर नगराध्यक्षांनी हा प्रश्न निकाली काढण्यासाठी काय करता येईल हा चर्चेचा सूर होता, असे सांगितले. पालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत न पाहता हा प्रश्न त्वरित सोडविण्याचे आवाहन या वेळी डॉ. टाटिया यांनी केले. पुढील सप्ताहात कर्मचाऱ्यांच्या मागणीस सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास २० फेब्रुवारीपासून बेमुदत संप अटळ असल्याचा इशारा युनियनच्या प्रवक्त्याने दिला. या प्रसंगी आरोग्य सभापती राकेश पाटील, नगरसेवक डॉ. योगेश चौधरी, सुपडू खेडकर, विनोद चौधरी, शोभा जैन यांनी चर्चेत भाग घेतला.