‘शब्दांवाचून कळले सारे शब्दांच्या पलिकडले’ असे एखाद्या छायाचित्राच्या बाबतीत घडू शकते. शाब्दिक बातमीपेक्षा जास्त परिणाम एखादे उत्कृष्ट छायाचित्रही साधून जाते. छायाचित्रकाने टिपलेली छायाचित्रेच इतकी बोलकी असतात की त्यातील आशय सांगण्यासाठी वेगळ्या शब्दांची गरज भासत नाही. पर्यावरण, वन्यजीवन आदी विषयांच्या माध्यमातून आपला स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या ‘नॅशनल जिऑग्राफी’ वाहिनीवर पुढील महिन्यात ‘मुंबई कव्हर शॉट’ हा आगळा रिअ‍ॅलिटी शो सुरू होत आहे. या कार्यक्रमातून मुंबईची वेगवेगळी रुपे पाहायला मिळणार आहेत.
 मुंबई शहर हे कधीच थांबत नाही, असे म्हटले जाते आणि ते खरेही आहे. घडय़ाळ्याच्या काटय़ावर धावणारी मुंबई आणि मुंबईकरांबद्दल मुंबईबाहेरील लोकांनाच जास्त उत्सुकता असते. मुंबईतील वाहने, जीवनवाहिनी असणारी उपनगरी रेल्वे, मुंबईतील गगनचुंबी इमारती, शेअर बाजार, भव्य उड्डाणपूल, ‘बेस्ट’बस, मुंबईतील खाऊ गल्ल्या, मुंबईचे पोलीस, मुंबईतील गुन्हेगारी आणि मुंबईतील अन्य अनेक गोष्टींबाबत सगळ्यानाच कुतूहल असते. मुंबईतील सांस्कृतिक जीवनात गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्र, धुळवड आदी सणांना विशेष महत्त्व आहे. मुंबई आणि मुंबईकरांचे लहान-मोठे मुड्स टिपणारी छायाचित्रे हे या कार्यक्रमाचे वैशिष्टय़ आहे.
या आगळ्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये सोळा छायाचित्रकार सहभागी होत असून या सहभागी स्पर्धकांना ‘मुंबई’छायाचित्रातून टिपण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे. प्रसिद्ध छायाचित्रकार समर सिंह जोधा व जाहिरात क्षेत्रातील दिग्गज नाव असलेले अभिनय देव हे या रिअ‍ॅलिटी शोसाठी परीक्षक म्हणून काम पाहणार असून अंतिम फेरीसाठी ज्येष्ठ छायचित्रकार रघु राज हे परीक्षक म्हणून सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिबानी दांडेकर करणार आहे.
छायाचित्रकारांनी काढलेली छायाचित्रे, त्यामागील किस्से, ते छायाचित्र त्याने कसे काढले याबाबत त्या छायाचित्रकाराची मुलाखतही या कार्यक्रमात दाखविण्यात येणार असून समरसिंह जोधा, अभिनय देव, रघु राज, शिबानी दांडेकर यांनी त्यांच्याशी संवाद साधलेला आहे. छायाचित्रकारांना कार्यक्रमाच्या काही भागांत विशिष्ट विषय देण्यात आला असून त्यावर त्यांना छायाचित्र काढण्यास सांगण्यात आले आहे. यात गणपती विसर्जन, मल्लखांब, कुस्तीचा आखाडा, मुंबईतील विविध बाजार, माऊंट मेरी, पोलीस, धारावी, उपनगरी रेल्वे, मुंबईचे आद्य रहिवासी असलेले कोळी आदींचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cover shot competition by national geographic
First published on: 23-10-2014 at 07:32 IST