मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाला १ एप्रिल ते ३१ जुलै दरम्यान ९०५ कोटी ९४ लाख रुपये एकूण महसूल प्राप्त झाला असून तो गेल्यावर्षीच्या तुलनेत १४.२ टक्के वाढला आहे.
गेल्यावर्षी याच कालावधीत ७९३ कोटी ५० लाख रुपये महसूल मिळाला होता. यंदा तो ९०५ कोटी ९४ लाख रुपये मिळाला. त्यापैकी केवळ जुलै महिन्यात २०८ कोटी ९९ लाख रुपये उत्पन्न झाले, हे विशेष. गेल्यावर्षी केवळ जुलै महिन्यात १४८ कोटी ७६ लाख रुपये उत्पन्न मिळाले होते. ते यंदा ४०.५ टक्के वाढले. एप्रिल ते जुलै दरम्यान माल वाहतुकीतून यंदा ७३८ कोटी ११ लाख रुपये नागपूर मंडळास मिळाले.
गेल्यावर्षी ६५३ कोटी ९४ लाख रुपये मिळाले होते. त्यात १२.९ टक्के वाढ झाली. केवळ जुलै महिन्यात माल वाहतुकीतून १६७ कोटी १० लाख रुपये मिळाले. गेल्यावर्षी ११६ कोटी ३४ लाख रुपये मिळाले होते. ते यंदा ४३.६ टक्के वाढले.
एप्रिल-जुलै महिन्यात प्रवासी वाहतुकीतून १४५.९२ कोटी रुपये महसूल मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाला मिळाला. गेल्यावर्षी ११९ कोटी ९२ लाख रुपये मिळाले होते. २१.७ टक्के उत्पन्न यंदा वाढले. केवळ जुलै महिन्यात ३७ कोटी ०२ लाख रुपये उत्पन्न मिळाले. गेल्यावर्षी २७ कोटी ९० लाख रुपये मिळाले होते. ३२.७ टक्के ते यंदा वाढले.

यावर्षी रेल्वेने उन्हाळ्याची सुटी व प्रवाशांची गर्दी लक्षात घेता विशेष गाडय़ांची संख्या वाढविली. शिवाय या गाडय़ा लांब पल्ल्याच्या होत्या. इतर वाहनांच्या भाडय़ात मोठय़ा प्रमाणात भाडेवाढ झाली असून तसेच सुरक्षितता लक्षात घेता प्रवाशांनी प्रवासासाठी रेल्वेला पसंती दिल्याचे निदर्शनास येते.