शांतीची वस्ती बागेत असते, असे म्हणतात. ज्यांना बागेची खरोखरच आवड आहे त्यांना बाग हे विश्रांतीचे स्थान वाटते. आपल्या आनंदासाठी आपण बागेत रमतो. हाच आनंद द्विगुणित करण्यासाठी काही टिप्स आज देते आहे.
 प्रत्येक कुंडीत वेगळय़ा प्रकाराची झाडे लावण्यापेक्षा एकसारखी झाडे आणि एकाच आकाराच्या कुंडय़ा घेऊन लावल्यास ती दिसायला चांगली दिसतात. यासाठी एरिका पाम, कॅलेडियम, डिफेनबेकिया, कोलियस, अ‍ॅकालिफा, ड्रेसिना ही झाडे चांगली दिसतील. फ्लोरिबंडा गुलाब, जरबेरा, पिटोनिया, अ‍ॅडेनियम, बोगनवेलीच्या फुलांच्या एकसारख्या कुंडय़ा बागेची शोभा निश्चितच वाढवतील. छोटय़ा छोटय़ा मडक्यातून ट्रॅडेन्सेशिया, मनीप्लांट, अ‍ॅस्परगससारखी झाडे छान दिसतील. काही छोटय़ा मोठय़ा मडक्यांना रंग देऊन ती मडकीही लँडस्केपस्मध्ये ठेवावीत. जागा असल्यास बागेच्या एखाद्या कॉर्नरला लँडस्केपिंग जरूर करावे. त्यामुळे तुमची बाग इतर बागांपेक्षा वेगळी वाटेल. या लँडस्केपिंगमध्ये मातीचा पाहिजे तसा उंचवटा करून त्यावर लॉन लावावे. वर एखादी झोपडी, त्यात राहणारा शेतकरी, बाजूला बैलगाडी, गाय, वासरू, बैल, प्राणी ठेवावेत. छोटी मडकी, रेलिंग्ज, बारीक दगड, रॉकरी, एखाद्या बाजूला सिझनल्ससाठी जागा ठेवावी. उथरांटाची बॉर्डर द्यावी. फुलांसोबतच पानांमध्येही वैविध्य असेल तर बागेची शोभा निश्चितच वाढेल.
सरू, बेंझामिना फायकस, अ‍ॅकालिफा, डय़ुरांटा या झाडांना पाहिजे तशा कटिंगनी आकार देता येतो. ही झाड लँडस्केपिंग करताना लावावीत. प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला कीटकनाशकाचा फवारा जरूर मारावा. एक बकेट पाण्यात दोन टेबलस्पून रोगोर आणि दोन टेबलस्पून बॉवेस्टीन पावडर टाकून स्प्रे करावा. कीड लागणार नाही. प्रत्येक कुंडीत दरवर्षी खुरपी करून नवीन माती व खताचे मिश्रण घालावे. सीझनल्सच्या कुंडय़ा ठेवण्यासाठी स्टँड बनवून घ्यावे. छत्रीच्या आकाराचे स्टँड दिसायला छान दिसतील. अ‍ॅकालफा, पॉइनसिटीयाच्या रोपटय़ांना थोडे मीठ पाण्यात विरघळून ते पाणी थोडे टाकल्यास लाल रंगाची मजा काही वेगळीच राहील. बागेत एखादी जागा जलबागेसाठी ठेवावी. पाँड करून त्यात कमळ, वॉटरलीली, वॉटर बांबूसारखी झाडे उठून दिसतील. छोटय़ा वाटोळय़ा दगडांनी रॉकरी करून त्यात क्लोरोफाटम, फर्न कुफिया, सायकस, रिबन ग्रास, मांडू ग्राससारखी झाडे मधून लावावीत. खुरपी, कात्री, झारी, स्प्रे, घमेले, कुदळ ही अवजारे बागेकरिता घरी असावीत.
बागेतील एखाद्या वॉलवर वारली पेंटिंग्ज करावे. आवडत असल्यास थोडा खर्च करावा लागेल, पण म्युरलही बागेची शोभा निश्चितच वाढवतील. गार्डन फर्निचर, झुला, सिरॅमिक्सचे पुतळे, वॉटरफॉलनेही गार्डन सजविता येईल. व्हरांडा समोर असेल किंवा बाल्कनीतही रांगोळी काढण्यासाठी कडप्पा लावून घ्यावा. त्याभोवती क्लोरोफायटमच्या एकसारख्या कुंडय़ा किंवा सिझनल्सच्या फुलांच्या कुंडय़ांनी बागेला वेगळेपणा आल्याशिवाय राहणार नाही. ड्रिफटवुडमध्ये मॉस लावून मनीप्लांट, अ‍ॅस्परगस, चायनीज वड, बेझामिना फायकस ही झाडे लावता येतील. खंगर म्हणजे जळलेला कोळसा, मोठय़ा खंगरवर बोनसाय करून किंवा मिनीएचर लँडस्केप करून छोटय़ाशा टॅरेबागेत किंवा बालकनीत वैविध्य आणता येईल. उद्यानकलेतील नावीन्यपूर्ण लँडस्केपही कमी जागेत मिनीएचर लँडस्केपिंग करून आपण करू शकतो. निसर्गप्रेम, सौंदर्यदृष्टी, बागेची आवड आणि अभिरुचीसंपन्नता अंगी असेल तर थोडय़ा परिश्रमानेही बाग चांगली करता येते. जे तुम्ही दहा वर्षांत करू शकला नाही ते तुम्ही मनात आणल्यास सहा महिन्यात करू शकता. निसर्गातले लहान लहान आनंद टिपता आले पाहिजे हा प्रयत्न सर्वानी करावा. पर्यावरण रक्षण हे प्रत्येकाच्या जीवनात महत्त्वाचेच आहे. झाड, फूल, पशुपक्षी, झरे, खळाळणारी नदी, हे सगळे डोळय़ासमोर आणावे. या सगळय़ा हव्याहव्याशा वाटणाऱ्या गोष्टींवर जर सर्वानी मनापासून प्रेम केले तर पर्यावरण वाचविण्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरजच नाही.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व विदर्भरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Create an inviting garden
First published on: 16-12-2012 at 12:26 IST