* सी विभागात ४२ टक्के पाणी दूषित
* निर्मळ पाण्यासाठी उभारलेला जलबोगदा निष्फळ
मुंबईला सरासरी २० टक्के दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे पालिकेच्याच पर्यावरण स्थितीदर्शक अहवालात उघड झाले आहे. दक्षिण मुंबईमधील सी विभाग कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक म्हणजे ४२ टक्के दूषित पाणी मिळत असून या परिसरातील नागरिकांना आरोग्याचे प्रश्न भेडसावत आहेत. या परिसरात स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठय़ासाठी उभारलेला जलबोगदा निष्फळ ठरला आहे. दूषित पाणीपुरवठय़ावर तोडगा काढण्याचे प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेना-भाजपने दिलेले आश्वासन वल्गना ठरू लागल्याचे या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.
पालिकेच्या पर्यावरण विभागाने २०१२-१३ दरम्यान मुंबईतील विविध भागांतील पाण्याच्या नमुन्यांची पालिकेच्या जी-उत्तर विभागाकडून चाचणी करण्यात आली. चाचणीअंती मुंबईला सरासरी २० टक्के दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे उघड झाले. चिराबाजार, सी. पी. टँक, कुंभारवाडा आणि आसपासच्या परिसरात (सी वॉर्ड) तर तब्बल ४२ टक्के पाणीपुरवठा दूषित असल्याचे पर्यावरण विभागाच्या पर्यावरण स्थितीदर्शक अहवालात नमूद करण्यात आले आहे. २०११-१२ मध्ये सी विभाग कार्यालयाच्या हद्दीत २५ टक्के दूषित पाणीपुरवठा होत होता. त्याखालोखाल पी दक्षिण (३१ टक्के), ई (२६ टक्के), एच-पूर्व (२५ टक्के), एफ-दक्षिण (२३ टक्के), एस (२२ टक्के) या विभागांमध्येही दुषित पाणीपुरवठय़ाचे प्रमाण अधिक आहे. विशेष म्हणजे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधूनच चक्क ११ टक्के दुषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे या अहवालात नमुद करण्यात आले आहे.
कुलाबा, चिराबाजार, गिरगाव आणि आसपासच्या परिसरात दूषित आणि अपुऱ्या पाणीपुरवठय़ामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी पालिकेने मलबार हिल ते स. का. पाटील उद्यान आणि स. का. पाटील उद्यान ते क्रॉस मैदान अशा दोन टप्प्यांमध्ये जलबोगदा उभारला. हा जलबोगदा कार्यान्वित केल्यानंतर दक्षिण मुंबईत स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा होईल, असे आश्वासन देण्यात आले होते. आजघडीला दक्षिण मुंबईकरांच्या दाराशी जलबोगद्यातून प्रवास करीतच पाणी येते. मात्र, जलबोगदा कार्यान्वित झाल्यानंतरही २०११-१२ च्या तुलनेत २०१२-१३ मध्ये दूषित पाणीपुरवठय़ात १७ टक्क्यांनी वाढ झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे जलबोगद्यावर केलेला कोटय़वधींचा खर्च पाण्यात गेल्याची टीका होऊ लागली आहे.
सी विभाग कार्यालयाच्या हद्दीमध्ये दाटीवाटीने उभ्या असलेल्या इमारतींमधील चिंचोळ्या घरगल्ल्या कचऱ्याने भरल्या आहेत. काही ठिकाणी  फुटलेल्या ड्रेनेज पाइपमधील पाणी घरगल्ल्यांमधून वाहते. घरगल्ल्यांच्या स्वच्छतेबाबत इमारत मालक उदासीन आहेत. या घरगल्ल्यांतील कचऱ्याच्या ढिगाऱ्याखालून जलवाहिन्या गेल्या आहेत. गंजलेल्या जलवाहिन्यांमधून दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे एका पालिका अधिकाऱ्याने आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा करण्याचे वचन सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीने निवडणुकीच्या जाहिरनाम्यात दिले आहे. मात्र मुंबईला होत असलेल्या दूषित पाणीपुरवठा लक्षात घेता युतीचा हा ‘जाहीरनामा’ ‘विसरनामा’ ठरला आहे, अशी टीका विरोधक करू लागले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily 20 percent contaminated water supply to mumbai
First published on: 27-09-2013 at 08:39 IST