* पाच वर्षांत टीबीचे ४० हजार मृत्यू
* दर ३४१ पैकी एकाला टीबी तर टीबीच्या पाच रुग्णांपैकी एकाचा मृत्यू
* ‘प्रजा’चा आरोग्य अहवाल प्रकाशित

आरोग्ययंत्रणेकडून अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेला क्षय अर्थात टीबीमुळे मुंबईत गेल्या पाच वर्षांत तब्बल ४० हजार मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. एवढेच नव्हे तर शहरातील दर ३४१ नागरिकांपैकी एकाला टीबी झालेला असून टीबी झालेल्या पाच रुग्णांपैकी एकाचा मृत्यू होत असल्याचे भयावह सत्य प्रजा फाऊंडेशनच्या आरोग्यविषयक अहवालातून समोर आले आहे. टीबीसोबतच डेंग्यू आणि कॉलरा या आजारांनीही धोक्याची घंटा वाजवली आहे.
टीबी हा आजार समाजात सर्वदूर पसरला आहे. टीबीविरोधात लढण्यासाठी केंद्रीय स्तरावर कार्यक्रम हाती घेण्यात आला असला तरी टीबीला उखडून टाकण्यासाठी हे प्रयत्न अगदीच तोकडे पडत असल्याचे प्रजा फाऊंडेशनने माहिती अधिकारातून मिळवलेल्या सांख्यिकीतून दिसत आहे. २००८-०९ पासून आतापर्यंत टीबीच्या रुग्णांची संख्या तीस ते पस्तीस हजार आहे. २०१२-१३ या वर्षांत ३६,४१७ रुग्णांना टीबी होता. शहरातील ३४१ नागरिकांपैकी एकाला टीबीचा संसर्ग झाला होता. गेल्या वर्षांत तब्बल ६९२१ रुग्णांचा मृत्यू टीबीमुळे झाला. याचाच अर्थ टीबी झालेल्या पाचपैकी एका रुग्णाचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. आधीच्या वर्षांंमध्ये चार रुग्णांपैकी एकाचा मृत्यू होत असल्याचे दिसते. मृत्यूच्या संख्येत थोडी घट झाली असली तरी पाचपैकी एकाचा मृत्यू हेसुद्धा भयंकर वास्तव आहे, असे प्रजा फाऊंडेशनचे विश्वस्त निताई मेहता यांनी सांगितले. आरोग्याच्या या स्थितीसाठी महानगरपालिका प्रशासन, नगरसेवक यांच्यासोबतच राज्यसरकार व केंद्रसरकारही जबाबदार आहे, असा आरोप त्यांनी केला.
टीबीसाठी प्रदूषणही कारणीभूत
शहरात सर्वत्र बांधकाम सुरू आहे. या बांधकाम क्षेत्रातील नागरिकांना टीबी होण्याची शक्यता अधिक असू शकते. मात्र याबाबत शास्त्रीय माहिती गोळा करण्याची गरज आहे, असे हिलीस संस्थेचे संचालक डॉ. मंगेश पेडणेकर यांनी सांगितले. मात्र सिगारेटमुळे टीबी वाढतो, हे सत्य आहे. धूम्रपान करणे हा वैयक्तिक इच्छेचा भाग असला तरी इतर कोणाच्या सिगारेटच्या धुरापासून सुटका करून घेणे हा प्रत्येकाचा हक्क आहे. धूम्रपानासंबंधीच्या कायद्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
डेंग्यूचा इशारा
पाच वर्षांत डेंग्यू रुग्णांच्या संख्येत सातपटीने वाढ झाली असून तीनपटीने मृत्यू वाढले आहेत. २००८-०९ या काळात सरकारी रुग्णालयांमध्ये डेंग्यूचे ६८२ रुग्ण होते. २०१२-१३ या वर्षांत ही संख्या ४८६७ वर गेली आहे. शहरात पाच वर्षांपूर्वी डेंग्यूमुळे २४ रुग्णांचा मृत्यू झाला होता तर २०१२-१३ या वर्षांत ही संख्या ७४ झाली.
मलेरिया – थोडी खुशी थोडा गम
मलेरियाने २०१० मध्ये धुमाकूळ घातला होता. त्यावेळी सरकारी रुग्णालयांमध्ये तब्बल ८० हजार रुग्ण दाखल झाले होते. २००९-१० या वर्षांत मुंबईत मलेरियाने १२२२ मृत्यू झाले. त्यानंतर महानगरपालिकेने विविध स्तरावर प्रयत्न केले. २०१०-११ या वर्षांत मलेरियाने ३८५ तर २०११-१२ या वर्षांत २३० मृत्यू झाले. यावर्षीही मलेरियाचा उद्रेक दिसत नाही. एकीकडे हा बदल चांगला दिसत आहे. मात्र त्याचवेळी २००८-०९ या वर्षांत मलेरियाचे ३५३ मृत्यू झाले होते, हेदेखील लक्षात घेतले पाहिजे. मलेरियाच्या आकडेवारीतील घट सरासरीएवढी न राहता त्यापेक्षाही खाली नेण्याचे आव्हान कायम आहे.
सरकारी रुग्णालयांमध्ये ३१ टक्के रुग्ण तर खासगीमध्ये ६२ टक्के
महानगरपालिका, राज्य सरकार यांची आरोग्य केंद्र, रुग्णालये यांच्यापेक्षाही खासगी दवाखाने आणि रुग्णालयांमध्ये जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मात्र खासगी रुग्णालयांकडे जाणाऱ्यांची माहिती उपलब्ध होत नाही. त्यामुळे प्रजा फाउंडेशनने शहरातील सर्व २४ वॉर्डमधील सुमारे २४००० नागरिकांना आरोग्यविषयक प्रश्न विचारले. या पाहणीत ३१ टक्के नागरिक केवळ सरकारी रुग्णांलयांमध्ये जात असल्याचे दिसते. त्यात समाजातील सर्व स्तरातील नागरिक आहेत. त्यामुळे एकीकडे सार्वजनिक आरोग्य यंत्रणा मजबूत करण्याची गरज आहे त्याचवेळी ६२ टक्के नागरिक फक्त खासगी दवाखाने व रुग्णालयांमध्ये जातात.

अंधेरी, कुर्ला टीबीचे ‘हॉट वॉर्ड’
गेल्या काही वर्षांत अंधेरी, कुर्ला हे विभाग टीबीसाठी कुप्रसिद्ध झाले आहेत. २०१२-१३ या वर्षांतही या भागात टीबीचे हजाराहून अधिक रुग्ण आढळले. के पूर्व विभागात टीबीचे १०६९ तर एल विभागात ९९४ रुग्ण आहेत. भायखळा येथील इ विभागातही ७४८ रुग्ण आढळले. किंग्ज सर्कल आणि माटुंगा या एफ उत्तर भागामध्ये मात्र आधीच्या वर्षांच्या तुलनेत कमी रुग्ण दिसत आहेत. पाचशे ते सहाशे रुग्णांवरून गेल्या दोन वर्षांत येथील रुग्णांची संख्या १८५ वर आली आहे. याशिवाय पालिका रुग्णालयांमध्ये २६, १९८ रुग्ण उपचार घेत असून राज्य सरकारच्या रुग्णालयांमध्ये ९४६ रुग्ण आहेत.