डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या टेक्निकल इन्स्टिटय़ूटच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त रंगांची चाचणी करण्याची प्रयोगशाळा (पेंट टेस्टिंग लॅबोरेटरी) सुरू करण्यात येणार असून अशा प्रकारची ही महाराष्ट्रातील पहिली प्रयोगशाळा असणार आहे, अशी माहिती डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या टेक्निकल इन्स्टिटय़ूटला पंचाहत्तर वर्षे पूण होत आहेत. या इन्स्टिटय़ूटमध्ये विविध व्यवसाय अभ्यासक्रम चालवले जातात. आता त्या जोडीला पेंट टेस्टिंग लॅबोरेटरी सुरू केली जाणार आहे. या प्रयोगशाळेला ‘नॅशनल अ‍ॅक्रिडेशन बोर्ड ऑफ लॅबोरेटरीज’ ची मान्यता मिळणार आहे. या इन्स्टिटय़ूटमध्ये सर्फेस कोटिंग टेक्नॉलॉजीच्या अभ्यासक्रमाबरोबरच आता विद्यार्थ्यांना ‘नॅशनल अ‍ॅक्रिडेशन बोर्ड ऑफ लॅबोरेटरीज’ चे पेंट टेस्टिंगचे प्रमाणपत्रही मिळणार आहे. २०१४ पासून या प्रयोगशाळेच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होणार आहे.
तयार केले जाणारे रंग निर्यात करण्यासाठी कंपनीला ‘नॅशनल अ‍ॅक्रिडेशन बोर्ड ऑफ लॅबोरेटरीज’ ची मान्यता आवश्यक असते. या प्रयोगशाळेमध्ये रंगाच्या विविध चाचण्या करून त्याची पत, टिकाऊपणा, कोणत्या मटेरिअलसाठी रंग चालेल अशा विविध गोष्टींची पाहणी करून त्याबाबत प्रमाणपत्र दिले जाते. हे प्रमाणपत्र देणाऱ्या प्रयोगशाळांची संख्या खूप कमी असल्यामुळे या प्रयोगशाळांना सध्या खूप मागणी आहे, अशी माहिती टफ कोट पॉलिमरचे संचालक प्रसाद पुरंदरे यांनी दिली.